चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अधिवेशन संपल्यानंतर काल रात्री अखेर बहुप्रतिक्षित असे महायुती सरकारचे खातेवाटप झाले. 15 डिसेंबरपासून मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अधिवेशनात खातेवाटप होईल, असे सांगितले जात होते. मात्र, अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशिरा अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या महायुती सरकारचे खातेवाटप झाले.
यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह, ऊर्जा (नवीकरणीय ऊर्जा वगळून), विधी व न्याय, सामान्य प्रशासन विभाग, माहिती व जनसंपर्क ही खाती मिळाली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क ही खाते मिळाली आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती मिळाली आहेत.
15 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये एकूण 39 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 33 जणांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकूण 39 जणांमध्ये खान्देशातील 4 आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. यामध्ये जळगाव ग्रामीणचे शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील, जामनेरचे भाजपचे आमदार गिरीश महाजन, भुसावळचे भाजपचे आमदार संजय सावकारे आणि धुळे जिल्ह्यातील शिंदखेडाचे आमदार जयकुमार रावल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर काल रात्री महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे.
– गुलाबराव पाटील यांना कोणते खाते मिळाले –
जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छता हे खाते मिळाले आहे.
– गिरीश महाजन यांना कोणते खाते मिळाले
जामनेर मतदारसंघाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन हे खाते मिळाले आहे.
– संजय सावकारे यांना कोणते खाते मिळाले –
भुसावळचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग मंत्रालय मिळाले आहे.
– जयकुमार रावल यांना कोणते खाते मिळाले –
शिंदखेडाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांना पणन आणि राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) हे खाते मिळाले आहेत.