परभणी, 23 डिसेंबर : परभणीत संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरुने विटंबना केली होती. यानंतर परभणीत आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन करत संताप व्यक्त केला होता. दरम्यान, या घटनेनंतर काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा समावेश होता. पण सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला. पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावर असून यावेळी ते सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
‘असा’ आहे राहुल गांधी यांचा दौरा –
राहुल गांधी यांचे आज 23 डिसेंबर रोजी राहुल गांधी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास नांदेड येथे विमानाने आगमन होणार आहे. त्यानंतर राहुल गांधी दुपारी 2 च्या सुमारास परभणीत दाखल होतील. यानंतर राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधणार असून त्यांचे सांत्वन करतील. तसेच दुपारी तीनच्या सुमारास विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर संध्याकाळी 7.30 च्या विमानाने नांदेडहून दिल्लीला रवाना होणार आहेत. याबाबतची माहिती राहुल गांधी यांच्या कार्यालयाने दिली आहे.
राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले असून यावेळी त्यांच्यासोबत राज्यातील अनेक नेते उपस्थित असणार आहेत. राहुल गांधींच्या परभणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे.