नागपूर – मी राजकारणी नाही. मला शह काटशाहचं राजकारण करता येत नाही. मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो. माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा सकारात्मकता आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
महायुतीच्या सरकारला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याआधी माजी केंद्रीय मंत्री, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आतापर्यंत चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोघांमधील कामाची पद्धत यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिले.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –
माध्यमांच्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की, मी राजकारणी नाही. मला शह काटशहाचं राजकारण करता येत नाही. मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो. माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा सकारात्मकता आहे. सगळ्याच क्षेत्रात सकारात्मकपणे काम करायचे, इंटरव्हेन्शन करायचं हा माझा प्रयत्न असतो. अनेकदा त्यात अडथळे येतात. ते डी-रेल होतं. पुन्हा आपल्याला ते मार्गावर आणावं लागतं आणि शेवटी, पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आता मुख्यमंत्री झालो, यातला महत्त्वाचा फरक हा की, अनुभवातून आपण शहाणे होत जातो.
Mla Anup Agrawal: ‘वक्फ बोर्ड भारतासाठी धोकादायक’, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल Exclusive मुलाखत
आपल्या चुका कमी होत जातात. चुका होत नाहीत, असं नाही. जो काम करेल, तो चुका करेल आणि जो निर्णय घेईल, तो चुकणार. जो निर्णयच करणार नाही. तो चुकणार नाही. मी या मताचा आहे की, निर्णयही केला पाहिजे आणि कधी चुका झाल्या तर त्या सुधारल्याही पाहिजे. आपण चूक केली तर प्रांजळपणे निर्णय मागेदेखील घेतला पाहिजे. मीदेखील अनेकवेळा घेतला. त्यामुळे माझी काम करण्याची पद्धत ही सकारात्मकतेने पुढे जायची आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.