रावेर : रावेरचे आमदार अमोळ जावळे यांनी मतदार संघाचा दौरा करीत असताना रावेर बसस्थानक येथे अचानक भेट देऊन परिसराची पाहणी केली. तसेच बसस्थानक परिवारात असलेल्या महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्रवासी जेष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधला. यावेळी बसफेऱ्या उशिराने सुटतात, तसेच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची उद्धट वागणूक मिळते, असा पाढा ग्रामी भागातील विद्यार्थ्यांनी वाचताच आमदार जावळे यांनी आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांना धारेवर धरले.
आमदार अमोल जावळे यांनी सोमवारी सायंकाळी अचानक शाळा व महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत रावेर एसटी बस स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी बस स्थानक परिसरातील स्वच्छता, कर्मचारी व प्रवाशांसाठी असलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली. तसेच रावेर बस आगार प्रमुख इम्रान पठाण खान, सहाय्यक आगार प्रमुख अडकमोल यांच्याशी प्रवाशांच्या समस्या जसे बसेस वेळेवर न सुटणे, परिसरातील स्वच्छता अशा महत्वपूर्ण विषयांवर त्यांनी चर्चा केली आणि या सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात यावे, यासाठी सूचना केल्या.
आमदारांनी काय निर्देश दिले –
विद्यार्थ्यांच्या बसेस उशिराने सुटत असल्याबाबत त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करून ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबाबत सक्त निर्देश दिलेत. पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहातील घाणीचे साम्राज्य पाहून त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांना असभ्य वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
यावेळी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जैस्वाल, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रा. सी. एस. पाटील, मनोज श्रावक, उमेश महाजन, भूषण महाजन आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रवासी प्रतिनिधी उपस्थित होते.