भुसावळ (जळगाव) : गेल्या काही दिवसात जळगावात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. चाळीसगाव शहरात मध्यरात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आता भुसावळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भुसावळ शहरात भर चौकात एका तरुणावर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
भुसावळ शहरात आज सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. याठिकाणी एका 32 वर्षीय तरुणावर गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागात आज शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तहरीन नासीर शेख (वय – अंदाजे 32) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुचाकीवरून आलेल्या चारपैकी तीन संशयितांनी पिस्तुलातून 5 गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या या घटनेनंतर संशयित घटनास्थळावरुन फरार झाले.
फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी आजची ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थरळी धाव घेतली. तसेच तपास सूरू किला आहे. हल्लेखोर फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे.