कापडणे : गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये जर चांगले लोक आले तर गावाचा नक्कीच विकास होतो आणि त्यासोबतच गावकऱ्यांना चांगल्या सुविधादेखील मिळतात. धुळे जिल्ह्यातील आपल्या गावकऱ्यांसाठी असाच एक चांगला उपक्रम राबवला आहे.
धुळे जिल्ह्यातील धनूर लोणकुटे ग्रुप ग्रामपंचायतीने नववर्षाच्या सुरुवातीला एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये गावातील ज्या कुटुंबाने घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्ण भरलेली असेल, अशा कुटुंबांना 31 मार्चपर्यंत मोफत शुद्ध पाणी घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे.
गावाच्या विकासासाठी घरपट्टी आणि पाणीपट्टी हे ग्रामपंचायतीचे मुख्य कर आहेत. त्यामुळे कुठल्याही ग्रामपंचायतीचा दैनंदिन खर्च आणि गावातील सोयी-सुविधांवरील खर्च हा घरपट्टी व पाणी पट्टीच्या कर संकलातूनच होत असतो. ही संकल्पना लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने आता ज्या कुटुंबांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण भरलेली असेल अशा कुटुंबांना 31 मार्चपर्यंत मोफत शुद्ध पाणी घरपोच दिले जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे सर्व कुटुंब शुद्ध पाणी घेतील, तसेच करवसुली गोळा करण्यासाठी देखील नागरिकांना प्रोत्साहन मिळणार आहे.
ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत गावाचे सरपंच यांनी ही संकल्पना मांडली. यानंतर संपूर्ण ग्रामपंचायत सहित ग्रामस्थांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला व त्याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने या निर्णयाची 1 जानेवारी 2025 पासून अंमलबजावणी सुरू केली आहे.
तर आता या उपक्रमामुळे अनेक नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरायला सुरुवात केलेली असून, अनेक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यायला सुरुवात केली आहे. तसेच भविष्यात 100 टक्के करमुक्त गाव करण्याचा निर्धार आहे, असे सरपंच चेतन कैलास शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा : Bhusawal Crime News : भर चौकात तरुणावर गोळीबार, भुसावळातील हादरवणारी घटना, नेमकं काय घडलं?