मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढवणाऱ्या तीन युद्धनौकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे सर्व मंत्री आणि आमदारांशी संवाद साधणार आहेत. दोन तासांच्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे सर्व मंत्री, आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पंतप्रधान यांच्या भेटीसोबतच्या संवादावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील –
माध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ही देशामधील किंवा राज्यातील पहिली घटना असेल की, पंतप्रधान एखादे नवीन सरकार आल्यावर आमदारांशी आपल्या राज्या बाबतीत आढावा घेतात. त्याचबरोबर राज्यासाठी काय केलं पाहिजे, केंद्रीय योजना असतील, राज्याच्या योजना असतील, निधीचा विषय असेल याबाबत चर्चा करतात. माझ्या 25 वर्षांच्या आमदारकीच्या काळात ही पहिली वेळ आहे की पंतप्रधानाबरोबर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला बोलण्याची संधी मिळते आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच आमदारांशी संवाद साधणार आहेत. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकींच्या दृष्टीने हा संवाद अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात महत्त्वाची महानगरपालिका मानली जाते. मागील 3 दशकांपासून या महानगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व असून भाजपला याठिकाणी स्वबळावर आतापर्यंत कधीच सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामुळे या महानगरपालिकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आगामी निवडणूक ही महत्त्वाची आहे. या सर्व निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत.
हेही वाचा – पानिपतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा