मुंबई, 3 फेब्रुवारी : प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने शाळा सर्वेक्षणाचा (ग्रामीण) अहवाल (असर) प्रकाशित केलेला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत ‘असर’ अहवालाबाबत काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. संस्थेने 20.4 टक्के विद्यार्थ्यांकडून संगणकाचा वापर होत असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. तथापि, एकूण 108,144 शाळांचा विचार करता संगणकाचा वापर करण्याचे प्रमाण 72.95 टक्के इतके आहे. सदर संस्थेने 48.3 टक्के शाळांमध्ये संगणक नसल्याचे नमूद केले आहे. वास्तविकतः एकूण शाळांपैकी 78.40 टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध आहे. मुलींकरिता साधारणतः 96.8 टक्के इतक्या शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उपलब्धता असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
प्रथम या संस्थेने 409 प्राथमिक व 463 उच्च प्राथमिक व त्यावरील अशा ग्रामीण भागातील एकूण 872 शाळांचे सर्वेक्षण केले आहे. युडायस (UDISE) डाटा सन 2023-24 अनुसार राज्यामध्ये एकूण 108,144 शाळा आहेत. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने एकूण शाळांच्या केवळ 0.81 टक्के इतक्या शाळांचेच सर्वेक्षण केलेले आहे. तसेच राज्यातील एकूण 2,09,61,800 शालेय विद्यार्थ्यांपैकी केवळ 33,746 मुलांचे सर्वेक्षण संस्थेने केले आहे जे की एकूण विद्यार्थ्यांच्या केवळ 0.16 टक्के इतके आहे. या आधारांवर अहवाल प्रकाशित केलेला आहे.
या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये बरेच सकारात्मक मुद्दे देखील आहेत.
यातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत :
वय वर्ष 6 ते 14 मधील 60.9 टक्के बालके ही शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत तर 38.5 टक्के बालके ही खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली व दुसरी मधील वाचन व गणितीय क्रिया यामध्ये विद्यार्थ्यांची संपादणूक व अध्ययन स्तर हा वाढल्याचे दिसून येते. इयत्ता तिसरी मधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कोरोना मध्ये झालेला अध्ययन क्षय भरून काढण्यात येत आहे असे दिसून येते. शासकीय शाळांमध्ये सन 2022च्या तुलनेमध्ये सन 2024मध्ये वाचनामध्ये 10.9 टक्के प्रगती दिसून येते. तर खाजगी शाळांमध्ये वाचनामध्ये 8.1 टक्के प्रगती दिसून येते. गणितीय क्रियांमध्ये शासकीय शाळांमध्ये १३.१ टक्के प्रगती दिसून येते व खाजगी शाळांमध्ये 11.5 टक्के प्रगती दिसून येते.
इयत्ता तिसरीतील मुले जी इयत्ता दुसरीच्या पातळीचे वाचन करू शकतात याचे महाराष्ट्राचे प्रमाण देशपातळीपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे. इयत्ता तिसरी मध्ये गणितीय क्रियांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र हा देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे. 2022च्या तुलनेमध्ये 2024मध्ये यात 13 टक्क्यांची वाढ दिसून येते. इयत्ता पाचवीच्या मुलांमध्ये सन 2022च्या तुलनेमध्ये सन 2024मध्ये वाचनामध्ये 2.2 टक्के अधिकची प्रगती झाल्याचे दिसून येते.
वय वर्ष 15 ते 16 याच्यामध्ये 98 टक्के विद्यार्थी हे शाळांमध्ये प्रवेशित आहेत. सर्वात कमी शाळाबाह्य विद्यार्थी असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे. वय वर्ष 14 ते 16 मधील विद्यार्थ्यांच्या डिजिटल साधनांची उपलब्धता मध्ये राज्यातील 94.2 टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहे व यातील 84.1 टक्के विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात. यामधील 19.2 टक्के विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्मार्टफोन असल्याचे नमूद केले आहे. यातील 63.3 टक्के विद्यार्थी हे शिक्षणाच्या संदर्भात स्मार्टफोनचा वापर करतात, तर विविध सामाजिक माध्यमांसाठी ७२.७ टक्के विद्यार्थी स्मार्टफोनचा वापर करतात.
सन 2024 मध्ये तीन वर्षाच्या पूर्व प्राथमिक शाळेमध्ये नोंदणी असणाऱ्या मुलांचे प्रमाण 95 टक्के आहे, 2022 मध्ये हे प्रमाण 93.9 टक्के होते. महाराष्ट्रात 6 ते 14 वयोगटातील पटनोंदणी दर गेल्या 8 वर्षांपासून 99 टक्के पेक्षा जास्त आहे. महामारीच्या काळात शाळा बंद असूनही, 2018 मधील 99.2 टक्के वरून एकूण पटनोंदणीचे आकडे 2022 मध्ये 99.6 टक्के पर्यंत वाढले आहेत आणि 2024 मध्ये सुद्धा स्थिर असल्याचे दिसून आले. म्हणजेच या वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण 0.4 टक्के आहे, जे की देशभरात 1.9 टक्के आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
हेही वाचा – “…अशा पंचांना गोळ्याच घातल्या पाहिजे!”; डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलने केले शिवराज राक्षेचे समर्थन