नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत आक्रमक होत महाराष्ट्रात अचानक 70 लाख मतदार कुठून आले असा सवाल करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरुन आरोप केले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
राहुल गांधींचा सवाल –
अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान, हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके लोक महाराष्ट्राच्या मतदान यादीत समाविष्ट झाले आहेत. जवळपास 70 लाख नवीन मतदार अचानक वाढले कुठून असा सवाल करत महाराष्ट्रात पाच वर्षांत जेवढे मतदार जोडले गेले त्यापेक्षा पाच महिन्यांत जास्त मतदार जोडले गेले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी शिर्डीचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, शिर्डीमध्ये एका ठिकाणी 7000 मतदार वाढले आहेत. विशेष म्हणजे नवीन मतदार हे भाजपला ज्या ठिकाणी आघाडी मिळाली असून त्या ठिकाणी जोडण्यात आले आहेत.मतदारांमध्ये आश्चर्यकारक वाढ झाल्याचा दावा –
राहुल गांधी पुढे म्हणाले की, मी आरोप करत नाही, मी फक्त असे म्हणत आहे की निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुकीची आकडेवारी काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (एसपी) यांना द्यावी. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उबाठा) पक्षाने मतदारांची संख्या वाढल्याबाबत निवडणूक आयोगाकडे उत्तरे मागितली होती. यासोबतच पाच महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात 50 लाखांहून अधिक मतदारांमध्ये आश्चर्यकारक वाढ झाल्याचा दावा काँग्रेसने यापूर्वी केला होता. यावेळी निवडणूक आयोगाने डिसेंबरमध्ये सांगितले होते की, राज्यातील मतदारांची नावे अनियंत्रितपणे जोडली किंवा काढली गेली नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत बोलणार –
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिभाषणावर बोलणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पाहा : Video : विश्वविजेत्या भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळेचा तरुणाईला काय सल्ला?