नाशिक, 27 फेब्रुवारी : नियमित ग्रंथ वाचनाने व्यक्तिमत्त्व समृध्द होते तसेच सकारात्मक विचार वाढण्यास मदत होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ समवेत परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही.कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी अध्यक्षस्थानावरुन सांगितले की, मराठी भाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. सर्वांनी सतत विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. पुस्तक वाचनातून साहित्याची आवड निर्माण होते. भाषा समृध्द होण्यासाठी त्यास बळकटी मिळते. समृध्द भाषेने व्यक्तिमत्त्व सकस होते. भाषा समृध्द होण्यासाठी मराठी साहित्याचे नियमित वाचन होणे गरजेचे आहे. भाषा संवर्धनासाठी मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, मराठी भाषा अभिजात भाषा असून ती अमृताशी पैंजा जिंकेल, असे यथार्थ वर्णन संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे. तीच मराठी माझी मातृभाषा आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. मराठी भाषेतील ग्रंथ, साहित्यसंपदा विपूल असून मराठीचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. सध्याच्या संगणक व मोबाईलच्या आभासी जगात वावरणारी तरुण आणि बाल अवस्थेतील पिढीने पुस्तकांचे वाचन केले पहिजे. पुस्तक वाचनातून व्यक्तिमत्त्वाला पैलू पडतात. लेखकांनी मांडलेले विचार व माहिती आपणांस मार्गदर्शक ठरते, असेही त्यांनी सांगितले.
तर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी नरहरी कळसकर यांनी सांगितले की, प्रत्येकाला वाचनाची सवय असावी. मराठी साहित्यात कथा, कादंबरी, कविता, विनोदी लेखन अशा अनेक प्रकारचे पुस्तके उपलब्ध आहेत. वाचन संस्कृतीची जोपासना सर्वांनी करावी. भेटवस्तू ऐवजी पुस्तक देण्यात यावे जेणेकरुन पुस्तकाच्या माध्यमातून वाचनाला चालना मिळेल. विद्यार्थी जीवनात वाचलेली पुस्तके आयुष्यभर प्रेरणादायी ठरतात, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ’जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विद्यापीठाचे कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, वित्त व लेखाधिकारी यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.
या कार्यक्रमात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी गीतगायन, नाटयप्रवेश, कविता वाचन सादर केले. विद्यापीठातील अधिकारी डॉ. संजय नेरकर, प्रकाश पाटील, रविंद्र रांधव, एस. एस. मुलानी, चेतना पवार, शैलेंद्र जमधाडे, मीना अग्नीहोत्री यांनी पुस्तकाचे अभिवाचन, कविता, गीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.