मुक्ताईनगर : आज कुठेतरी महिलांना सुरक्षा देण्यात गृह खाते हे अपयशी ठरलेले आहे. पोलीस यंत्रणा ही कुठल्या दबाबात आहे? की पोलीस यंत्रणा ही गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे? दोन दिवसात एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या छेडखानी प्रकरणात का कारवाई झाली नाही? कुठला दबाव होता?, ते कुणाचे कार्यकर्ते होते की ज्याच्यासाठी राजकीय दबाव वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही?, असे संतप्त सवाल राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या यात्रेत टवाळखोर मुलांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटोही काढले. या धक्कादायक प्रकारानंतर टवाळखोर मुलांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चारही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे –
या प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी एक व्हिडिओ शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आज परत ऐरणीवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना या आपल्याला वाढल्याचे दिसत आहे. पण आज कोथळी या गावी स्वत: केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्याही मुलीची म्हणजे माझ्या भाचीची छेडखानीचा प्रकार हा दोन दिवस आधी आदीशक्ती संत मुक्ताईच्या यात्रेत झालेला होता. त्यांच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी दोन दिवस आधी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारदेखील नोंदवली आणि दोन दिवस आधी नोंदवलेल्या या तक्रारीची दखल घेऊन ज्या उनाड, टवाळ मुलांच्या बाबतीतली ही तक्रार होती, त्यांच्यावर साधी कारवाईसुद्धा करण्यात आली नाही. त्यांना अटकसुद्धा करण्यात आली नाही. माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील भगिनींना न्याय कसा मिळणार?, असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, केंद्रीय मंत्र्यांना स्वत: पोलीस ठाण्यात हजर राऊन कारवाईची मागणी करावी लागते. या सर्व प्रकारात आपल्याला एकच पाहायला मिळते आहे की, आज कुठेतरी महिलांना सुरक्षा देण्यात गृह खाते हे अपयशी ठरलेले आहे. पोलीस यंत्रणा ही कुठल्या दबाबात आहे? की पोलीस यंत्रणा ही गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे? दोन दिवसात एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीच्या छेडखानी प्रकरणात का कारवाई झाली नाही? कुठला दबाव होता?, ते कुणाचे कार्यकर्ते होते की ज्याच्यासाठी राजकीय दबाव वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही?, असे संतप्त सवालही रोहिणी खडसे यांनी केले.
आज आम्ही संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघात कुठल्या गुंडागर्दीमध्ये वाढतोय, आम्हाला आज महिलांना कशाप्रकारची वागणूक दिली जात असेल, याचा आपण अंदाज काढू शकतो. कारण आज एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडखानी केल्यावरही दोन दिवसात कारवाई झाली नाही तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलींचा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन तक्रार नोंदवण्याची तरी हिम्मत होणार आहे का, ज्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम पोलीस यंत्रणा करत आहे, त्यांनी याचे उत्तर देणे गरजेचे आहे आणि ज्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी, आमची मागणी आहे कारण कुठलातरी राजकीय दबाव असल्याशिवाय दोन-दोन दिवस तक्रार असूनही त्यांना जे संरक्षण दिलं जातंय, हे का दिलं जातंय, याचंही उत्तर पोलीस यंत्रणा आणि गृहविभागाने द्यायला हवे, अशी मागणीही रोहिणी खडसे यांनी केली.
हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..