मुक्ताईनगर : अलीकडे 3-4 वर्षात वाढलेली गुंडागर्दी आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत मी स्वत: खूपवेळा आक्रमकपणे बोललेलो आहे. सरकारला मी म्हटलंय की तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का हे थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे. परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही. कारण या सर्व गुंडांना याठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे, असा गंभीर आरोप माजी मंत्री आणि विद्यमान विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केला.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या यात्रेत टवाळखोर मुलांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटोही काढले. या धक्कादायक प्रकारानंतर टवाळखोर मुलांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चारही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे -.
याप्रकरणी माध्यमांशी बोलताना आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. याठिकाणी ज्यांनी छेडखानी केली ते निव्वळ टवाळखोर नाही तर गुंड आहेत. त्यांच्याविरुद्ध आधीही काही गुन्हे दाखल आहे. या मुली ज्यावेळी यात्रेत होत्या त्यावेळी एक पोलीस तिथे हजर होता. त्या पोलिसाने त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली. त्याला शिवीगाळ केली. त्या पोलिसाने 353 त्यांच्यावर दाखलही केला. पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरात घडला असं नाही. हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रात अशा स्वरुपाच्या अनेक घटना घडत आहेत.
अनेक घटनांची नोंद होत नाही. किंवा महिला तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार करायला पुढे येत नसल्याने अशी प्रकरणे उघडकीस येत नाही आणि हा जो प्रकार घडला, या संदर्भात रक्षाताईंची मुलगी तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे. नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाहीत. या विषयाच्या संदर्भात मुक्ताईनगरमध्ये जी गुंडागर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे, हे अलीकडे 3-4 वर्षात वाढलेली गुंडागर्दी आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत मी स्वत: खूपवेळा आक्रमकपणे बोललेलो आहे. सरकारला मी म्हटलंय की तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का हे थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे. परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही. कारण या सर्व गुंडांना याठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे, असा गंभीर आरोप माजी मंत्री आणि विद्यमान विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केला.
तसेच ते पुढे म्हणाले की, अलीकडचा विषय सोडला जरी तरी याठिकाणी मागच्याही कालखंडात दोन-तीन वर्षांपासून पाहत आहे की, मुख्यमंत्री कार्यालयातून पोलिसांना फोन यायचे की, यांसदर्भात गुंडांना संरक्षण देण्याच्या बाबतीत, असं मला स्वत: पोलीस सांगायचे. असं असेल तर ते दुर्दैवी आहे. आणि याठिकाणी महाराष्ट्रात आता महिलांनी यासंदर्भात स्वत:च काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही. पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही, अशी आजची स्थिती आहे. याठिकाणी पोलीस अधिक कठोर कारवाई करतील, अशी माझी अपेक्षा आहे. हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही तर हा सामाजिक प्रश्न आहे, या दृष्टीकोनातून याकडे पाहिलं पाहिजे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..