मुंबई : ठाण्यातील गुंडांप्रमाणेच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारी तीच प्रवृत्ती, तोच पक्ष आणि त्याच पक्षाचे हे महान सामाजिक कार्यकर्ते आहेत, जसा त्यांचा नेता, तशी त्यांची खालची ही पोरं बाळं सगळी, टपोरी चिल्लर, अशी टीका करत शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या सेनेवर जोरदार निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महाराष्ट्रात यांचा चोख बंदोबस्त करावा, अशी मागणीही केली.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या यात्रेत टवाळखोर मुलांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटोही काढले. या धक्कादायक प्रकारानंतर टवाळखोर मुलांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी हे शिंदेंच्या शिवसेनेचे असल्याचं बोलले जात आहे. तसेच त्यातील एक आरोपी पीयूष मोरेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. या घटनेवरुन संजय राऊत यांनी राज्य सरकार तसेच शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांना पोलीस खातं पाहायला राजकारणातून वेळच मिळत नाही –
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचाच विनयभंग झाला आणि गृहमंत्री कोण तर स्वत: आमचे देवेंद्रजी फडणवीस. राजकारणातून त्यांना वेळच मिळत नाही पोलीस खातं पाहायला. कायदा आणि सुव्यवस्था पाहायला. जनतेचे प्रश्न पाहायला. आता विनयभंग करणारा सामाजिक कार्यकर्ता कोण, हे सामाजिक कार्यकर्तेच आहेत ना सगळे, वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, धनंजयराव मुंडे. हे सगळे पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. मोठे सामाजिक काम त्यांनी या महाराष्ट्रात उभे केलेले आहे. तर तो जो कार्यकर्ता आहे, तुम्ही जो म्हणत आहात, त्याचा विद्यमान उपमुख्यमंत्र्यांबरोबर असलेला फोटो आम्ही दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर छापलेला आहे. या महाराष्ट्रात तुम्ही सत्तेच्या बळावर काय पेरत आहात, या विचारांचे हे सर्व लोकं हे सगळे जिथे सत्ता तिथे बलात्कारी, व्याभिचारी आणि खूनी आणि हत्यारे आहेत, या शब्दात संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
काल ठाण्यात आम्ही गेलो. या गुंडांनी आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. एकेकाळच्या आनंद दिघे साहेबांच्या आश्रमासमोर आता तो एकनाथ शिंदेंनी आपल्या नावावर करुन घेतला. त्याठिकाणी आमच्या गाड्या अडवल्या. आमच्यावर तिथे हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी तिथे चांगला बदोबस्त ठेवला. त्यानंतर आम्ही दिघे साहेबांनी पुष्पहार अर्पण केला. शाल अर्पण केली. मात्र, आमची पाठ बळताच या अशाच गुंडांनी जे, रक्षा खडसेंच्या बाबतीत तिकडे झालं, ते त्याच विकृतीचे गुंड आहेत, तो हार त्यांनी रस्त्यावर फेकला. शाल रस्त्यावर फेकली. हा दिघे साहेबांचा अपमान नव्हे का. माननीय, दिघे साहेबांचे नाव घेताना गुरुवर्य म्हणता आणि तुम्ही त्यांच्या गळ्यातील हार रस्त्यावर तुडवता फेकून देता, हे काल राज्याच्या जनतेने पाहिले आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारी तीच प्रवृत्ती, तोच पक्ष आणि त्याच पक्षाचे हे महान सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे महाराष्ट्र घडवणार?, हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार?, जसा त्यांचा नेता, तशी त्यांची खालची ही पोरं बाळं सगळी, टपोरी चिल्लर, अशी टीका करत खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या सेनेवर जोरदार निशाणा साधला. तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महाराष्ट्रात यांचा चोख बंदोबस्त करावा, अशी मागणीही केली.
रक्षा खडसेंच्या घरातील घटनेमुळे परत एकदा समोर आले –
तुमच्या केंद्रीय मंत्र्यांची जर मुलगी सुरक्षित नसेल तर या राज्यातील सामान्य घरातील लेकीबाळींचे काय परिस्थिती आहे. नुसतं लाडकी बहीण, लाडका भाऊ हे असं नुसतं खुळखुळं वाजवून तुम्हाला याठिकाणी फारकाळ राहता येणार नाही. रोज लाडक्या बहिणींचा विनयभंग होत आहे. पण रक्षा खडसेंच्या घरातील घटनेमुळे परत एकदा हे समोर आले आहे.
हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..