ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव हरेश्वर (पाचोरा) : नुकताच 8 मार्च रोजी सर्वत्र जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जनजागृती अभियानांतर्गत पत्रकार संघ पिंपळगाव परिसर व माजी विद्यार्थी संघ संचलित, मूकबधिर निवासी विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, आई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख अतिथी कुऱ्हाडच्या सरपंच कविता महाजन, वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली सोनवणे, पोलीस विभागाच्या सरला मंगरुळे, योगिता चौधरी, होमगार्ड रेखा कांबळे होत्या. या सर्व महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
तसेच विद्यालयातील विद्यार्थी सार्थक विष्णू जंजाळ याची राज्यस्तरावर लांब उडी या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, महिला मान्यवर व सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने त्याचा सत्कार करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आपले विचार मांडले. यावेळी महिला दिनानिमित्त विशेष विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला स्थानिक पत्रकार किशोर लोहार, दीपक मुलमुले, राजू ठाकूर, तिवारी सर, सुनील लोहार, किशोर लोहार, संदीप सर, दिलीप जैन, पांडे दादा, गजानन लोंढे, भिकन पाटील, चंद्रकांत मोहोर, भालचंद्र राजपूत, रोशन जैन, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी. मान्यवरांसह विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शन करून सदर कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप भाऊ यांनी केले.