महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात एक बोली भाषा बोलली जाते. महाराष्ट्राच्या विदर्भात बोलली जाणारी वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी बाज हा तिचा खास गुणधर्म आहे. वऱ्हाडी बोलीत बोलताना एक वेगळीच गंमत असते. शब्दांच्या उच्चारांतील लयबद्धता आणि लहेजा मराठीला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करतो. असंच एक वऱ्हाडी भाषेतील “झामल झामल” हे भाषेतील गाणं नुकतंच प्रसिद्ध झालं आहे आणि विशेष म्हणजे हे गाणं प्रसिद्ध होताचं सोशल मीडियावर ट्रेंडिंग सुद्धा गेलं आहे. माय मराठी भाषेतील बोली भाषांना आजही लोक आवडीने त्या भाषेत संवाद साधतात तसेच अमराठी लोकांनाही या भाषा आवडतात, हे यावरुन दिसून येत आहे.
झामल झामल गाण्यात लोकप्रिय अभिनेत्री राजेश्वरी बोकन आणि अभिनेता विश्वास पाटील यांची नवीन जोडी पाहायला मिळेल. अक्षय शिवाजी भाकरे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला सौरभ मास्तोळी यांनी संगीत दिलं आहे. तर गाण्याचे बोल प्रशांत तिडके यांचे आहेत. गायिका सानिका अभंग हिने हे गाणं गायलं असून या गाण्यातील रॅपचा भाग रॅपर ओंकार दासगुडे यांनी गायला आहे. या गाण्याचे कोरिओग्राफर विकी वाघ हे आहेत. या गाण्याची निर्मिती सौरभ मास्तोळी यांनी केली आहे.
अभिनेता विश्वास पाटील या गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतो, “मी मुळचा मराठवाड्यातला आहे. आणि हे गाणं विदर्भातील वऱ्हाडी प्रांतातील आहे. मी जेव्हा पहिल्यांदा भाषा ऐकली तेव्हा ही भाषा मला खूप साजूक वाटली आणि मी लगेच गाण्यासाठी होकार दिला. गाण्याची संपूर्ण टीम फार मेहनती होती. त्यामुळे गाणं शूट करताना खूप मजा आली. टीमचे आणि प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो.”
अभिनेत्री राजेश्वरी बोकन या गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “गाण्याची प्रोसेस खूप कमाल होती. परंतु गाण्याच्या शुटींगच्याच दिवशी मी आजारी पडले होते. कोरीओग्राफर विकी दादा पण बोलत होता की तू आता कसं शूट करणार आणि हे गाणं डान्सिकल आहे, या गाण्यात एनर्जीवाले स्टेप्स होते. परंतु काय माहित माझ्यात कुठून एनर्जी आली मी ते संपूर्ण गाणं शूट केलं. आणि आता या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय हे पाहून आनंद होत आहे.”
तर या गाण्याचे निर्माते आणि संगीतकार सौरभ मास्तोळी या गाण्याविषयी सांगतात, “गीतकार प्रशांत तिडके माझे मित्र आहेत ते मला म्हणाले की आमच्या विदर्भाच्या भाषेत एकही गाणं अजून आलेलं नाही. तेव्हा आमचं ठरलं की विदर्भाच्या भाषेत वऱ्हाडी गाणं करूया. “झामल झामल” या शब्दाचा अर्थ आहे टंगळ मंगळ करणे किंवा टाईमपास करणे. तर विदर्भातील वऱ्हाडी भाषेतील हे रोमॅंटीक गाणं आहे. गाण्यात एक कपल दाखवलं आहे. ज्यात त्या मुलीचं मुलावर प्रेम असतं आणि त्या मुलाचं ही मुलीवर प्रेम असतं. फक्त तो थोडासा इंट्रोवर्ट असतो. या गाण्याद्वारे ती मुलगी त्याला प्रेमाने विचारत असते की चल आता भाव खाऊ नकोस हो म्हणं. या गाण्यातून त्यांची प्रेमाने केलेली नोकझोक आणि वऱ्हाडी भाषेचा तडका अगदी उत्तम झाला आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता त्यांना हे व-वऱ्हाडी गाणं आवडलं आहे. ही आमच्या कामाची पोचपावती आहे.”
गायिका सानिका अभंग या गाण्याच्या रेकॉर्डींग दरम्यानचा अनुभव सांगते, “हे माझं पहिलंच व-हाडी गाणं आहे. जेव्हा आम्ही या गाण्याची रेकॉर्डींग करत होतो. तेव्हा प्रत्येकाचे पाय या गाण्यावर थिरकत होते. आणि हे गाणं रेकॉर्ड करताना आम्ही खूप धम्माल केली.” मधुर संगीत, हृदयस्पर्शी कथा, व-हाडी बोली भाषा आणि लाजवाब लोकेशन्सच्या माध्यमातून झामल झामल हे गाणं सर्व प्रेमीयुगूलांसाठी एक परिपूर्ण रोमँटिक भेट ठरणार आहे.