बोदवड (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला आहे. हा अपघात जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकावर घडला. धान्याने भरलेला ट्रक थेट रेल्वे रुळावर आल्याने हा मोठा अपघात झाला. मुंबईहून अमरावतीला जाणाऱ्या एक्सप्रेसला हा अपघात झाला. सुदैवाने रेल्वे एक्सप्रेसचा वेग कमी असल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. मात्र, अपघातानंतर अनेक गाड्या या मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला या वेगवेगळ्या स्थानकांमध्ये अडकून पडल्या आहेत.
नेमकं काय घडलं –
मुंबईवरुन येणाऱ्या मुंबई-अमरावती एक्सप्रेसने धान्याच्या ट्रकला धडक दिल्याने अपघाताची घटना घडली. बंद असलेला रेल्वे गेट भेदून भरधाव ट्रक हा रेल्वे ट्रॅकवर आला. यामुळे रेल्वे आणि ट्रकची धडक झाली. आज पहाटेच्या भुसावळ जवळ असलेल्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, याचा वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन सणासुदीच्या काळात हा अपघात झाल्याने वाहतूक खोळंबली.
बोदडवला असलेल्या जुना रेल्वे गेटवर एक ट्रक ऐनवेळी रेल्वे ट्रॅकवर आला. आणि याचवेळी आलेल्या मुंबई-अमरावती एक्सप्रेसने त्या ट्रकला धडक दिली. एक्सप्रेसचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या अपघातामुळे बोदवड नाडगाव जवळ धान्याने भरलेला एक ट्रक हा ट्रॅकवर अडकून पडला. या घटनेनंतर रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर रेल्वे रूळावर अडकून पडलेला ट्रक आणि रेल्वे इंजिन वेगळे करण्याचे प्रयत्न आता युद्धपातळीवर सुरू आहेत. काही वेळात याठिकाणी वाहतूक ही सुरळित होईल असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, यामध्ये नवजीवन एक्सप्रेस, सुरत-भुसावळ पॅसेंजर जळगाव स्थानकावर थांबवण्यात आल्या. तर अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस, भुवनेश्वर एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस भुसावळ आणि वरणगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या. याचा फटका प्रवाशांना बसला.
हेही वाचा – मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : ‘…त्यामुळे पोलीस आरोपींना पकडण्यास धजावत नाहीत’, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप
हेही वाचा – हेही वाचा – Digital Arrest : केंद्र सरकारची मोठी कारवाई, डिजिटल अरेस्टमध्ये सहभागी हजारो व्हॉट्सॲप नंबर आणि स्काईप आयडी बंद