चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव : शिक्षण क्षेत्रात अनेक मोठमोठी विषय आहेत. सीबीएसई, आयसीएसई तिथे ज्याच्याकडे पैसा आहे, तो भारतात नाही, तर भारताच्या बाहेरही शिकवू शकेल. पण प्रत्येक गोरगरिबाला वाटतं की, माझाही पोरगा शिकला पाहिजे. माझाही पोरगा आयएएस, आयपीएस, डॉक्टर झाला पाहिजे. शासनाच्या अनेक योजना आहेत. पण जर त्याला योग्य दर्जाचं शिक्षणच मिळू शकत नसेल तर ते आपल्या सर्वांचं दुर्दैव असणार आहे. म्हणून गोरगरिबांच्या मुलांना उद्याचं उज्वल भविष्य दाखवायचं असेल तर त्यादिशेने आपण सुविधा निर्माण केल्या तर आपल्याला 100 टक्के यश मिळेल, असे प्रतिपादन पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज केले.
‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील जि. प. मराठी शाळा, होळ या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक जि.प. मराठी शाळा, कढोली तर तृतीय क्रमांक जि.प. प्राथमिक शाळा, सावरखेडे (ता. पारोळा) या शाळेने पटकाविला आहे. तर माध्यमिक खासगी गटातून प्रथम आलेल्या कै. यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालय, तांदुळवाडी यांना ११ लाख रुपये व स्मृतिचिन्ह, सारजाई कुडे माध्यमिक शाळा, धरणगाव यांना ५ लाख व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांकावरील जनता हायस्कूल, नेरीला ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे बक्षीस आहे, जाहीर करण्यात आला होता. हा पारितोषिक वितरण सोहळा आज ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात करण्यात आला. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील बोलत होते.
काय म्हणाले आमदार किशोर आप्पा पाटील –
यावेळी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, ज्याप्रमाणे एखाद्या सीबीएसई शाळेत प्रवेश घेण्यासाठी रांगा लागतात, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मराठी शाळा होळ याठिकाणी रांगा लागतात, हे अभिनंदन आणि कौतुक करण्यासारखी आमची जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्या शाळेत असा एकही विद्यार्थी नाही, जिथे स्कॉलरशिपमध्ये त्याचा नंबर लागला नाही. आज जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती पाहिली तर अतिशय उत्तमपणे शिक्षक बांधव काम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शासन म्हणून अनेक गोष्टी आपण या राज्यात करण्याचा प्रयत्न करतो. परंतु शेतकरी आणि विद्यार्थी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शेतकरी हा आपण देशाचा राजा म्हणतो. पण तो सर्वात दुर्लक्षित आहे. आणि उद्याचं भविष्य असलेला विद्यार्थीही दुर्लक्षित आहे. राज्य शासनाने सीबीएसईची घोषणा केली. पण शिक्षकांचं काय हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे.
दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की, आपण माध्यमिक किंवा कॉलेज पाहिलं तर एका विषयाचा एक शिक्षक आहे पण रिटायरमेंट पर्यंत तो पुस्तक घेतल्याशिवाय शिकवतो असा मी एकही शिक्षक पाहिला नाही. त्यामुळे ही परिस्थिती आपल्या बदलायचं असेल तर, उद्याचं भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळांकडे लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे.
याचं कारण असं की आजच्या तारखेत जिल्हा परिषदेच्या शाळा जर आपण पाहिल्या तर त्यात फक्त मजुरांचा पोरगा जातो. चांगला शेतकरी, नोकरदार, अशा एकही व्यक्तीचा मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेत जाताना दिसत नाही. ज्या मोल मजुरी करणाऱ्या व्यक्तिला आपल्या पोराला तालुक्याला पाठवायची परिस्थिती नाही अशाच पालकाचा मुलगा तुम्हाला जिल्हा परिषदेच्या शाळेत दिसेल. म्हणून होळसारख्या शिक्षकांची निर्मिती होणं गरजेचं आहे.
आज अशी परिस्थिती आहे की, शाळेचं लाईटबील भरायला पैसे नाहीत. शाळेला शुद्ध पाणी नाही. शाळेत टॉयलेट बाथरुमसाठी व्यवस्था नाही, असे म्हणत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी याकडे लक्ष देण्यावरही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.
आमदार किशोर आप्पा यांनी केला विजय सिंघल यांचा उल्लेख –
दरम्यान, आपल्या भाषणादरम्यान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जळगावचे माजी जिल्हाधिकारी विजय सिंघल यांचाही उल्लेख केला. आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, कुठलाही आयएएस अधिकारी आल्यावर कुठलीतरी एक गोष्ट हातात घेतो आणि त्या भागाचं काहीतरी कल्याण करुन जातो. मागच्या काळात आपल्याकडे विजय सिंघल नावाचे कलेक्टर आले आणि त्यांनी नदीजोड प्रकल्प हाती घेतला. दोन वर्षात नदी जोडप्रकल्पात बऱ्यापैकी पाण्याची क्षमता आपल्या जिल्ह्यात तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
त्यामुळे जसं मंत्रिमहोदय म्हणाले की, भिंतीला कलर मारला म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा चांगली झाली नाही. तिथं शिकणारा विद्यार्थी जोपर्यंत प्रगतीच्या दिशेने जात नाही. तोपर्यंत याला यश मिळणे शक्य नाही. म्हणून आपण एक आयएएस अधिकारी म्हणून, जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर, या शाळांचा दर्जा आपल्याला उंचावता येईल का, शासन सीबीएसई पॅटर्न घेऊन येत आहे, त्यादिशेने आपल्याला सुविधा निर्माण करता येतील का, असेही आवाहनही त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना केले. तसेच शिक्षण क्षेत्र जर आपण टारगेट केलं तर आपल्याला ते कठीण नाही.
शिक्षण क्षेत्रात अनेक मोठमोठी विषय आहेत. सीबीएसई, आयसीएसई तिथे ज्याच्याकडे पैसा आहे, तो भारतात नाही, तर भारताच्या बाहेरही शिकवू शकेल. पण प्रत्येक गोरगरिबाला वाटतं की, माझाही पोरगा शिकला पाहिजे. माझाही पोरगा आयएएस, आयपीएस, डॉक्टर झाला पाहिजे. शासनाच्या अनेक योजना आहेत. पण जर त्याला योग्य दर्जाचं शिक्षणच मिळू शकत नसेल तर ते आपल्या सर्वांचं दुर्दैव असणार आहे. म्हणून गोरगरिबांच्या मुलांना उद्याचं उज्वल भविष्य दाखवायचं असेल तर त्यादिशेने आपण सुविधा निर्माण केल्या तर आपल्याला 100 टक्के यश मिळेल, असेही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी सांगितलं.
या कार्यक्रमात प्राथमिक गटातून जि. मराठी शाळा, होळ या शाळेला प्रथम क्रमांकाचे 11 लाख रुपये रोख व स्मृतिचिन्ह तर द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या जि.प. मराठी शाळा, कढोली या शाळेला पाच लाख रुपये रोख व स्मृतिचिन्ह व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या जि.प. प्राथमिक शाळा सावरखेडे या शाळेला तीन लाख रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात आले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी कॅबीनेट मंत्री संजय सावकारे, जळगाव महानगर पालिकेच्या माजी महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेतील पुरस्कार विजेत्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, आदी उपस्थित होते.