सॅलफोर्ड, 6 मे : महाराष्ट्र राज्याच्या खान्देश परिसरातील अनेक तरुणांनी फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव झळकावले आहे. त्यातच आता आणखी एका नावाची भर पडली आहे. खान्देशच्या जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ येथील एक तरुण थेट इंग्लंडमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. निनाद विवेक ओक असे या तरुणाचे नाव आहे.
निनाद विवेक ओक हे जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ येथील रहिवासी आहेत. तसेच ते गेल्या 7 वर्षांपासून इंग्लंडमध्ये (सॅल्फोर्ड, ग्रेटर मँचेस्टर, यूके) येथे टेक महिंद्रा लिमिटेड मार्फत ऑनसाइट असाइनमेंटवर सॉफ्टवेअर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. दैनंदिन नोकरीच्या कामाव्यतिरिक्त, मला नेहमीच लोकांची सेवा करण्याची आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची आवड असल्याने, मी मार्च 2021 मध्ये यूकेमधील तिसरा सर्वात मोठा राजकीय पक्ष – लिबरल डेमोक्रॅटमध्ये सामील झालो. तेव्हापासून मी पक्षाच्या सर्व राजकीय आणि निवडणूक प्रचारात स्वयंसेवी म्हणून कार्यरत आहेत.
माझे कौशल्य, माझी आवड, माझे वक्तृत्व आणि माझे लेखन आणि मी पक्षासाठी गेल्या अडीच वर्षात केलेल्या मेहनतीमुळे पक्षाने मला यावेळी स्थानिक परिषद निवडणुकीत (कॅडिशेड आणि लोअर इर्लामसाठी सिटी कौन्सिलरची निवडणूक) नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली. UK मध्ये, भारताप्रमाणे, अशी कोणतीही राज्ये नाहीत. त्यामुळे याठिकाणी आमदार ही संकल्पना नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर एक नगरसेवक असतो आणि त्यानंतर थेट त्या वरचा खासदार असतो. त्यामुळे कौन्सिलर निवडणुकीसाठी उभे राहणे हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहण्याइतकेच महत्त्वाचे आहे, जितके भारतात झाले असते, असेही त्यांनी सांगितले.
निनाद ओक यांनी सुवर्ण खान्देश लाईव्हला दिलेली प्रतिक्रिया –
दरम्यान, मतदानानंतर निनाद यांनी सुवर्ण खान्देश लाईव्हला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आजचे हे टीमवर्क होते. पण आमच्या प्रचार टीमला सलाम. या भागातील मजूर पक्षाच्या मजबूत प्रभावाविरुद्ध माझी ही पहिलीच निवडणूक आहे. आम्ही घरोघरी जाऊन प्रचार केला. तेव्हा आम्हाला सर्व लोकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही लोकांना घराबाहेर पडून मतदान करायला लावलं. आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीत चांगली कामगिरी होईल, असेही ते म्हणाले.
परवा 4 मेला ही निवडणूक झाली. तसेच पुढील आठवड्याच्या सुरुवातीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत खान्देशपूत्र निनाद बाजी मारतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.