बीड, 10 एप्रिल : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुनावणी आज गुरुवारी 10 एप्रिल रोजी पार पडली आहे. दरम्यान, या सुनावणीत हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी असलेल्या वाल्मिक कराडने स्वतःला निर्दोष म्हटले आहे. मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असा अर्ज देखील त्याने न्यायालयात सादर केला आहे.
आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? –
बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. दरम्यान, सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी बाजू मांडली. तर दुसरीकडे आरोपींच्या वतीने ॲड. विकास खाडे यांनी बाजू मांडली.
आरोपींच्या वकिलांनी मागील सुनावणीत काही कागदपत्रे मागितली होती. त्यानुसार सरकारी पक्षाच्या वतीने ती कागदपत्रे न्यायालयात जमा करण्यात आली. सीलबंद पॉकेट्स स्वरूपात ही कागदपत्रे होती. आता ते न्यायालयासमोर उघडली जाणार त्यानंतर आरोपींच्या वकिलांना दिली जाणार असल्याचीही माहिती समोर आलीय. दरम्यान, सीलबंद पॉकेटमध्ये 164 ब चे जवाब पंचनामे यासह इतर बाबींचा समावेश असल्याचे समजते.
उज्ज्वल निकम काय म्हणाले? –
दरम्यान, सुनावणी पार पडल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आरोपीच्या वकिलांनी मागितलेली कागदपत्रे सादर केली. संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ देखील न्यायलयात हजर केला. व्हिडीओ आरोपींनीच रेकॉर्ड केला असून हा व्हिडीओ बाहेर येऊ नये, अशा विनंती न्यायालयाला केली.दरम्यान, वाल्मिकने या प्रकरणात तो सहभागी नाही असा अर्ज केला आहे. डिस्चार्जमध्ये अनेक मुद्दे मांडले असून या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग नाही आणि इतर बाबी या अर्जात आहेत. सीआयडीकडून वाल्मिक कराडच्या संपत्तीवर तपास सुरू असल्याचेही उज्वल निकम यांनी सांगितले.
वाल्मिकचा निर्दोष मुक्तीसाठी अर्ज –
वाल्मिक कराडने एक अर्ज दाखल केला असून यात त्याने स्वतःला निर्दोष असल्याचे म्हटले आहे. मला या खटल्यातून मुक्त करावे, कारण माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, खून किंवा खंडणीप्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही”, असे त्याने या अर्जात म्हटल्याचे अॅड. निकम यांनी सांगितले. दरम्यान, आता त्यावर न्यायालयाने सीआयडीला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितले असून येत्या 24 तारखेला म्हणणे न्यायालयात सादर केले जाणार आहे. त्यावर सुनावणी होणार असून दोन्ही बाजूने युक्तिवाद होतील, असेही उज्ज्वल निकम यांनी स्पष्ठ केले.
पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी –
उज्ज्वल निकम पुढे म्हणाले की, खून आणि खंडणी प्रकरणाशी आपला संबंध नाही, असे सांगून यातून सुटण्याचा वाल्मिक कराडचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. पण मकोका कायद्यांतर्गत सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज दाखल केला असून यात वाल्मिक कराडचीही संपत्ती जप्त करण्यासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, ही संपत्ती जप्त करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती न्यायालयाला करणार असल्याचे निकम यांनी सांगितले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे.
हेही वाचा : “आम्ही पण घरात पवारसाहेबांना दैवत मानत होतो; आजही मानतो!”; अजित पवारांच्या विधानाने चर्चांना उधाण