जळगाव, 13 एप्रिल : रावेर तालुक्यात 12 एप्रिल रोजी व जळगाव तालुक्यात 13 एप्रिल रोजी आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व गारपिटीनंतर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः रावेर शहरासह भोकर, भादली खुर्द परिसरामध्ये तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही केळी व मका या नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवकाळीमुळे शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता –
वादळामुळे बऱ्हाणपूर – अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाच्या मदतीने तत्काळ एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून, वीज वाहिन्यांचेही नुकसान झाले आहे. उन्हाच्या तडाख्यानंतर थोडासा गारवा अनुभवास आला असला तरी गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून काही शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.
पालकमंत्र्यांनी दिले तत्काळ पंचनाम्याचे निर्देश –
या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनामार्फत बाधित भागात नुकसानीचा प्राथमिक आढावा घेण्याचे कार्य सुरू असून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तात्काळ मदतीचा प्रस्ताव तयार करा –
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत की, शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता तात्काळ मदतीचा प्रस्ताव तयार करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदतीचा दिलासा देता येईल. तसेच हवामान खात्याच्या सूचनांचा विचार करून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे व पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.