जळगाव, 14 मे : महाराष्ट्र राज्य मृद परीक्षण व जमीन आरोग्य पत्रिकांच्या आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली राबवणारे आघाडीचे राज्य आहे. सध्या राज्यात खरीप हंगामाची पेरणी सुरू असून, डिएपी (Di-Ammonium Phosphate) खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डिएपीमध्ये 18 टक्के नत्र व 46 टक्के स्फुरद हे प्रमुख अन्नद्रव्ये असतात.
शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला –
डिएपी खताची संभाव्य कमतरता लक्षात घेता, त्यास पर्यायी खतांचा वापर करणे गरजेचे ठरत आहे. यामध्ये एसएसपी (Single Super Phosphate) हे सर्वाधिक वापरले जाणारे पर्यायी खत असून, त्यात टक्के स्फुरद, सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळतात. विशेषतः तेलबिया पिकांसाठी सल्फरयुक्त एसएसपीचा वापर फायदेशीर आहे. डिएपीच्या एका गोणीऐवजी, अर्धी गोणी युरिया व तीन गोणी एसएसपी यांचा समन्वयित वापर डिएपीस योग्य पर्याय ठरतो.
तसेच, एनपीके (NPK) प्रकारातील संयुक्त खते जसे की,
NPK 10:26:26
NPK 20:20:0:13
NPK 12:32:16
NPK 15:15:15
यांच्या वापरामुळे पिकांना नत्र, स्फुरद आणि पालाश या तीनही प्रमुख अन्नद्रव्यांचा समतोल पोषण मिळतो. त्यामुळे या संयुक्त खतांचा उपयोगही पिकांसाठी उपयुक्त ठरतो.
बाजारात उपलब्ध पर्यायी खतांचा योग्य प्रकारे वापर करावा –
टिएसपी (Triple Super Phosphate) हे आणखी एक प्रभावी पर्यायी खत असून, त्यामध्ये 46 टक्के स्फुरद आढळतो. डिएपीच्या एका गोणीच्या बदल्यात अर्धी गोणी युरिया व एक गोणी टिएसपी वापरल्यास तोही डिएपीला उत्तम पर्याय ठरतो.
कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, खरीप हंगामात केवळ डिएपी खतावर अवलंबून न राहता बाजारात उपलब्ध पर्यायी खतांचा योग्य प्रकारे वापर करावा, जेणेकरून पेरणी व उत्पादनात अडथळा येणार नाही.






