जळगाव, 16 मे : बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खरीप हंगाम 2025 आढावा बैठक पार पडली. यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल जावळे तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
खरीप हंगाम 2025 आढावा बैठक –
जळगाव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत गुणवत्तापूर्ण बियाणे, खते, कीटकनाशके यासह शेतकऱ्यांना आवश्यक निविष्ठा उपलब्धतेबाबत, कृषी विभाग आणि संलग्न विभागाच्या विविध योजना, मोहिमा, तंत्रज्ञान आणि आगामी हंगामासाठीचे नियोजन यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
दरम्यान, या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खालीलप्रमाणे महत्वपुर्ण निर्देश दिले.
- बोगस बियाणे व खत विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा.
- तालुकास्तरावरील 15 व जिल्हास्तरावर 1 भरारी पथक नेमले असून प्रत्येक तालुक्यात बी-बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा वेळेत होणेबाबत खात्री द्या.
- शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 तसेच ग्रामपंचायती, सेवा सोसायट्यांमध्ये उपलब्ध करून द्या.
- हवामान यंत्रणा अद्ययावत ठेवा; आवश्यक ठिकाणी नवीन यंत्रे बसवा.
- “एक अधिकारी, एक गाव” अभियानाअंतर्गत गावपातळीवर जनजागृती शिबिरे राबवा.
- “पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे” – शेती शाळांच्या माध्यमातून कार्यशाळा घ्या.
- पावसाळ्यात “कुकुंबर मोॉक व्हायरस” रोगाविषयी जनजागृती करा (गाव बैठक, वेबिनार,).
- “एक जिल्हा – एक पिक” (केळी पासून प्रक्रिया) या उपक्रमासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्या.
- बियाणे व खत पुरवठा – जिल्ह्यात नियोजनबद्ध व पर्याप्त बियाणे व खताचा पुरवठा सुनिश्चित करावा.
- वितरणातील गोंधळ किंवा कृत्रिम तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्या.
- आत्महत्याग्रस्त व अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मोफत बियाणे व खते देण्याची मागणी झालेली आहे. त्यासाठी योग्य कार्यवाही कृषी विभाग करणार आहे.
- नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई देणे बाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहे.
- फळबाग लागवड योजना, मनरेगा व सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना प्रभावी राबविणे.
- पिक विमा योजनेंतर्गत कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी विमा कंपन्यांना निर्देश दिले.
- उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे “शेतकरी ओळख पत्र” (Farmer ID) लवकरात लवकर पूर्ण करावे.
- ठिबक सिंचन अनुदान -2023-24 मध्ये प्रलंबित 227 कोटींचे 28,578 शेतकऱ्यांना वाटप पूर्ण.
- उर्वरित 55 कोटींचे प्रलंबित ठिबक चे दायित्व शासन स्तरावरून लवकर मंजूर करण्यात येईल.
- गाळमुक्त धरण – जल युक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवा.
- पोकरा योजना – टप्पा क्र. 2 अंतर्गत जिल्ह्यातील 319 गावांचा समावेश.
- 259 सरपंचांना यशदा संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले कार्यवाही गतीने करा.
- महावितरण/वीज वितरण विभागास शेतीस अखंड वीजपुरवठा करा- विशेषतः बागायती कपाशी पिकांसाठी/खराब राहिलेले ट्रान्सफॉर्मर/पोल तात्काळ दुरुस्त करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
- सौर कृषी पंप जोडण्या गतीने करा/पीएम कुसुम ‘ब’ घटकांतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्या.
- मनरेगा – तालुका व गावपातळीवर शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त रोजगार हमीची कामे हाती घ्यावे .
खरीप हंगाम 2025 ची जळगाव जिल्ह्याची आकडेवारी –
खरीप हंगामात पेरणी एकूण पेरणी क्षेत्र हे 7.69 लाख इतके असून यापैकी कापसाचे प्रस्तावित क्षेत्र 5.05 लाख हेक्टर इतके आहे. यासाठी कापूस बियाण्यांची गरज ही 25.25 लाख पाकिटे असणार आहे. दरम्यान, बनावट बियाण्यांविरोधात कारवाईसाठी 15 तालुकास्तरीय तसेच एक जिल्हास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक पंचायत समितीत व तालुका कृषी कार्यालयात प्रत्येकी 1 अशी एकूण 30 नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. अद्याप पीककर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मंजुरी देऊन वितरण करण्याचे आदेशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांना केले आवाहन –
- उष्णतेपासून स्वतःची काळजी घ्या. सध्या उष्णतेची लाट तीव्र आहे. खरीप हंगामाची मशागत करतान शेतकरी बांधवांनी शक्यतो सकाळी लवकर शेतीची कामे पूर्ण करून आरोग्याची काळजी घ्यावी.
- बोंड अळीच्या नियंत्रणासाठी आणि चांगल्या उगमासाठी 100 मिमी पावसाची नोंद झाल्यानंतरच 1 जूननंतर पेरणी करावी.
- बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. धुळ पेरणी टाळावी.
- रासायनिक खतांचा मर्यादित वापर – रासायनिक खतांमुळे जमिनीत नायट्रेट्स वाढून कॅन्सरसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जैविक खतांचा वापर वाढवावा.
- बोगस कंपन्यांपासून सावध राहा – अनधिकृत व फसव्या कंपन्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.
- बी-बियाणे, खते यांची खरेदी करताना पक्के बिल घ्यावे व ते हंगामभर जपून ठेवावे.
- सौर कृषी पंप योजनांचा लाभ घ्या – योजना व अर्ज प्रक्रिया याबाबत माहिती घेऊन योग्य कागदपत्रांसह अर्ज करावा.
- मिश्रपीक व आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा एकाच पिकावर अवलंबून न राहता शाश्वत शेतीसाठी कापसासोबत तुर, उडीद, मूग यासारखी कडधान्ये आंतरपीक म्हणून घ्या.
- जिल्ह्यात यावर्षी भरपूर चारा उपलब्ध असून पशुधनासाठी चाराटंचाईचा प्रश्न उद्भवणार नाही.
- सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.






