जळगाव, 17 मे : ऐन उन्हाळ्याचे दिवस असताना राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडतोय. अशातच जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशातच जळगाव जिल्ह्याला पुढील तीन-चार तासांसाठी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयएमडीचा अवकाळी पावसाचा इशारा नेमका काय? –
मुंबईच्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुणे, सातारा, अहमदनगर, रायगड, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत 40-50 किमी प्रति तास वाऱ्यासह तर जळगाव, जालना, बीड, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग व धाराशिव या जिल्ह्यांत 30-40 किमी प्रति तास वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयएमडीच्यावतीने नागरिकांनी खालीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व नागरिकांनी पुढील काळजी घ्यावी –
1. जनावरे व प्राणी यांची सुरक्षितता
- जनावरे झाडाखाली बांधू नयेत.
- विजेच्या धक्यापासून बचावासाठी त्यांना मेटल शेडखाली ठेवू नये, विशेषतः जे अर्थिंग शिवाय आहेत.
- तसेच त्यांच्या अन्नपाण्याची सोय करून त्यांना कोरड्या व सुरक्षित ठिकाणी ठेवा.
2. विजांचा कडकडाट असताना सुरक्षित वागणूक
- विजांचा धोका असताना मोबाइल वापरत चालू नका.
- दुचाकीवरून प्रवास टाळा. पावसात व वादळात अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
3. जुनी व अपूर्ण इमारतींपासून दूर रहा
- मोडकळीस आलेल्या किंवा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीपासून सुरक्षित अंतर ठेवा.