चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 21 मे : लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने मला तिकिट दिले. यानंतर महायुतीचे मुख्यमंत्री, कॅबीनेट मंत्री-पालकमंत्री, आमदार, सर्वच नेते, पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली आणि तसेच जनतेने दिलेल्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने मला विजयी केले आणि यामुळेच उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार दिला जात असल्याच्या भावना खासदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केल्या. ही लोकं जर नसते तर कदाचित मी या पुरस्कारासाठी पात्र ठरले नसते. म्हणून हा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद असून या सर्व लोकांना मी माझा पुरस्कार समर्पित करते, अशा भावना खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केल्या.
संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर स्मिता वाघ यांची विशेष मुलाखत –
लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कार 2025 ची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील सात खासदार संसदरत्न ठरले आहेत. दरम्यान, स्मिता वाघ यांनी खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये उत्कृष्ठ कामगिरी करत संसदरत्न पुरस्कारावर नाव कोरंलय. यानिमित्त त्यांची सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्यावतीने विशेष मुलाखत घेण्यात आली.
खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, प्राईम पॉइंट फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ठ संसदपटू म्हणून 2010 सालापासून हे पुरस्कार दिले जातात. मी केलेल्या कामाची कोणीतरी दखल घेतली आणि त्यामाध्यमातून पाठीवर शाबीसकीची थाप जेव्हा दिली जाते त्यावेळी आणखी काम करण्याची उर्जा मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, जे.पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि आमचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण हे जर नसते तर मला तिकीट मिळालं नसतं. यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला तिकिट मिळालं.
हा पुरस्कार सर्वांना समर्पित करते –
यासोबतच जनता-जनार्दनाने आशीर्वाद दिला आणि महायुतीचे मंत्री-पालकमंत्री, आमदार सर्वच नेते, पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी मेहनत घेत मोठ्या मताधिक्याने मला विजयी केले आणि यामुळेच उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार दिला जात असल्याच्या भावना खासदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केल्या. ही लोकं जर नसते तर कदाचित मी या पुरस्कारासाठी पात्र ठरले नसते. म्हणून हा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद असून ही सर्व लोकांना मी माझा पुरस्कार समर्पित करत असल्याचे खासदार वाघ म्हणाल्या.
खासदारकीच्या कामगिरीबाबत काय म्हणाल्या? –
गेल्या एक वर्षाच्या खासदाराकीच्या अनुभवाबाबत बोलताना स्मिता वाघ म्हणाल्या की, देशाच्या सर्वोच्च सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळा आनंद आहे. मतदारसंघाच्या विविध प्रश्नांना सभागृहात हात घातला जातो. सभागृहात मतदारसंघातील अनेक प्रश्न मांडून त्याचे निराकरण झाले तर स्वतःसह जनतेला देखील मोठा आनंद असतो.
गेल्या एका वर्षात कृषी, रेल्वे, विमान तसेच सामाजिक प्रश्न अशा विविध विषयांवर काम करता आले. यामध्ये पाडळसरे धरण, रेल्वेच्या कनेक्टिविटी तसेच विमानतळासंदर्भातील काही प्रश्न मांडले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच भारतीय हवाई प्राधिकरणाचे अध्यक्ष यांची भेट घेत जळगाव विमानतळासंदर्भात सध्यास्थितीतील विषयांची मांडणी केली, असल्याचे खासदार स्मिता वाघ म्हणाल्या.
जळगाव विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू –
जळगाव विमातळासंदर्भात स्मिता वाघ पुढे म्हणाल्या की, केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून विमानतळासंदर्भात आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या असून एका कमिटीने देखील विमानतळाची पाहणी केलीय. जळगाव विमानतळाची आता जी इमारत आहे ती छोटी असून तिला विस्तारित करण्याचे नियोजन सुरू आहे. यासाठी नव्या इमारतीसाठी प्रस्ताव पाठवला असून तो लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे.
यासोबतच विमानतळाची धावपट्टी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यामुळे मोठी विमाने याठिकाणी आली तर जळगाव जिल्ह्याच्या व्यापार वाढीस मदत होईल. तसेच शेतकऱ्यांच्या त्यांचा माल पोहचविण्यासाठी मोठी संधी प्राप्त होईल. विमानतळ हे केवळ फक्त प्रवाशांना ने-आण करण्यासाठी मर्यादित न ठेवता शेतीपूरक जे विषय आहेत त्यालाही त्याचा उपयोग झाला पाहिजे, यासाठी काम सुरू असल्याचे खासदार स्मिता वाघ म्हणाल्या.
भाजपच्या प्रतोतपदी निवड झाल्याबाबत काय म्हणाल्या? –
मागील वर्षी खासदार स्मिता वाघ लोकसभेत भाजपच्या प्रतोतपदी निवड करण्यात आली. यामध्ये 12 खासदारांचा एक ग्रुप असतो. यापद्धतीने महिला खासदारांचे दोन ग्रुप तयार करण्यात आले आणि एका ग्रपुचं नेतृत्व खासदार वाघ यांच्याकडे आहे. याबाबत त्या म्हणाल्या की, देशात सर्वाधिक खासदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. 540 सदस्यांपर्यंत एकाच वेळ नाही पोहचता येत म्हणून ज्या ग्रुपमध्ये आम्ही करतो त्या सर्व खासदारांसोबत एकमेकांसोबत संवाद साधून संसदीय कामकाजाबाबत चर्चा होते तसेच चांगले विषय मार्गी लावण्याचे काम त्यामाध्यमातून केले जाते आणि संवादाच्या माध्यमातून एकजूट देखील होते. यासोबतच पटलावर चे विषय मंजूर होण्यासाठी संख्याबळाची आवश्यकता असते. त्यासाठी गटाच्या माध्यमातू ते काम करता येते.
दिशा समितीतील सक्रिय सहभागाबाबत काय म्हणाल्या?-
जिल्हा स्तरावर केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘दिशा’ समितीत खासदार स्मिता वाघ यांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळतो. याबाबत त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या माध्यमातून दिशा समिती स्थापन करण्यात आली आहे. रेल्वे, विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, पोस्ट ऑफिस अशा जवळपास 66 विषयाशी निगडित चर्चा करून प्रकल्प मार्गी लावले जातात. दिशा समितीच्या माध्यमातून आमदार, जिल्हाधिकारी तसेच प्रत्येक विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीत अनेक विषयांवर चर्चा केली जाते आणि जनतेच्या सुखसुविधांसाठी असलेल्या या प्रकल्पांचे काम मार्गी लावण्याचे काम केले जाते.
दरम्यान, अधिकारी आणि पदाधिकारी ही प्रशासनाची दोन चाके असून ती चाक सोबत चालली तर कामाला गती येते. मात्र, त्यापैकी एक चाक जरी मागे पडले तरी संपुर्ण प्रकल्प मागे पडतो. आम्हाला लोकांनी निवडून दिलंय म्हणून लोकांच्या समस्या त्याठिकाणी मांडणे आणि तिथून ते विषय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असतो. यामुळे दोघांनी जर जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पडली तर तो प्रकल्प योग्यरित्या मार्गी लागतो. यामध्ये काही अधिकारी उत्तमरित्या काम करतात. मात्र, काही अधिकारी मागे पडतात. म्हणून अशा अधिकाऱ्यांना दिशा समितीच्या बैठकींमध्ये योग्य त्या सूचना देत प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जातात, असे खासदार वाघ म्हणाल्या.
जळगाव जिल्ह्याच्या बेरोजगारीबाबत काय म्हणाल्या? –
मागील काही दिवसांपुर्वी आलेल्या एका अहवालानुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक बेरोजगारी जळगाव जिल्ह्यात असल्याचे समोर आले होते. यावर बोलताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, तरूणांच्या रोजगारासाठी काही कंपन्यांसोबत बोलणे सुरू आहे. कोणताही उद्योग व्यवसाय त्याठिकाणी येण्यासाठी पाणी, वीज आणि दळणवळणासाठी कनेक्टिव्हिटीची गरज असते. यामुळे जळगाव जिल्ह्यात रेल्वेची कनेक्टिविटी चांगलीय.
मात्र, जळगावातील विमानतळ अद्यावत नसल्याने जिल्ह्यात उद्योगधंदे आणण्यासाठी कुठेतरी कमी पडतोय आणि म्हणून येत्या काळात विमानतळाची अद्यावत कामे करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. तसेच एकदा का विमानतळ अद्यावत झाले तर उद्योगासंदर्भातील अनेक कंपन्यांशी बोलता येईल. यामाध्यमातून जर 10-12 हजार कोटींचे उद्योग याठिकाणी आले तर जिल्ह्यातील बेरोजगारी काही प्रमाणात कमी करू शकतो.
आपल्या भागातील प्रश्न मार्गी लागण्यासाठी 100 टक्के प्रयत्नशील –
संवादाच्या शेवटी खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, मतदारसंघातील जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत. त्यावर काम सुरू आहे. जनतेसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी ओळखून त्यावर काम करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे काम आहे आणि मी ते करत आहे. माझ्याकडे रेल्वे, बेरोजगारी, धरण, विमानतळ असे अनेक विषय आहेत. त्यासाठी महिना-दीड महिन्यात मीटिंग घेऊन सातत्याने पाठपुरावा करून ते कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही 100 टक्के प्रयत्नशील असतो.
दरम्यान, नुसते जनतेत फिरून काम होणार नाही तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बसून काम होणार नाही. तर त्याचा समन्वय साधणे आमचे काम आहे. खरंतर, जनता आणि सरकार यांचातला दुवा म्हणून लोकप्रतिनिधी असतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून हा आम्ही ही भूमिका निभावली नाही तर जनताही नाखूश आणि सरकारही नाखूश असेल. त्यामुळे हा समन्वय साधून आपल्या भागातील समस्या आणि विषय सरकार दरबारी मांडून आम्ही ते सोडवत असल्याचा विश्वास खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केला आहे.