पुणे, 24 मे : राज्यात सध्या वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरण समोर आल्यानंतर महिला आयोगावर देखील टीका केली जातेय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी महिला आयोगाला धारेवर धरत रूपाली चाकणकर यांच्यावर मनुष्वधाचा गुन्हा का नको असा सवाल उपस्थित केला. दरम्यान, रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत नाफडे प्रकरणाविषयी जाब विचारलाय.
रोहिणी खडसे काय म्हणाल्या होत्या? –
पुण्यात रोहिणी खडसेंनी काल मृत वैष्णवी हगवणे हिच्या आई-वडिलांची भेट घेतली. यानंतर माध्यमांसोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, महिला आयोगाकडे मयत वैष्णवीची जेठाणी मयुरीने महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्याचवेळेस योग्य ती कारवाई झाली असती आणि त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असती तर वैष्णवीचा आज जीव गेला नसता. मात्र, त्या तक्रारीनंतर रूपाली चाकणकर यांचं विश्लेषण जर पाहिलं असेल तर त्यांनी असं म्हटलंय की, हा परिवारीक वाद होता. त्यामुळे आम्ही चर्चेतून मार्ग काढायला सांगितला.
निष्काळजी पणामुळेच वैष्णवीचा जीव गेला –
एवढ झाल्यानंतरही ती महिला येऊन तक्रार द्यायला येते मात्र, हे चर्चेतून का मार्ग काढताय. तुम्ही अटक का केली नाही असा सवाल उपस्थित करत चाकणकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये, अशी टीका रोहिणी खडसेंनी केली होती. तसेच हे स्वतः त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकणार नाही. यांच्या निष्काळजी पणामुळेच वैष्णवीचा जीव गेला असल्याचा गंभीर आरोप रोहिणी खडसेंनी राज्य महिला आयोगावर केलाय.
View this post on Instagram
रूपाली चाकणकर काय म्हणाल्या?-
रोहिणी खडसेंनी उपस्थित केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, रोहिणी खडसेंचे स्वीय सहायक पांडुरंग नाफडे यांच्या पत्नी सीमा पांडुरंग नाफडे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार केलीय. यामध्ये सीमा नाफडे यांनी सांगितलंय की, रोहिणी खडसे आणि त्यांच्या शहराध्यक्षांनी मला धमकी दिलीय की, जर घराच्या बाहेर निघाले आणि तक्रार दाखल केली तर आम्ही जीवे मारू. यामुळे दिव्याखाली अंधार असणाऱ्यांनी आयोगावर बोलू नये. आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आलोय. दरम्यान, नाफडे प्रकरणात काय केलंय, हे सांगावं असं आव्हान देखील रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंना दिले आहे.