जळगाव, 26 मे : यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असताना आता मान्सूनचे आगमन झाले आहे. केरळमध्ये नुकताच दाखल झालेला मान्सून अखेर काल 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला असून राज्यात आता मान्सूनचा जोर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यासह कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलीय.
राज्यात मान्सून दाखल –
केरळमध्ये मान्सूनच्या आगमनानंतर तळकोकणात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलीय. मान्सूनबाबतची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. साधारणतः महाराष्ट्रात 7 जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, यावर्षी 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून गेल्या 16 वर्षांतून पहिल्यांदाच असे घडत आहे. दरम्यान, मान्सूनच्या आगमनाची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
बारामतीसह पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी –
बारामतीसह पुणे जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावलीय. पुणे शहरासह बारामती आणि दौंड परिसरात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काल 25 मे रोजी रविवारी झालेल्या पावसामुळे बारामतीत झालेल्या पावसामुळे दीडशेहून अधिक लोकांच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. या पावसामुळे नागरिकांचे ही मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आज पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवर हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज काय? –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोकण वगळता खान्देश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यात काही पुढील तीन-चार दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.