जळगाव, 28 मे : यंदा मे महिन्यातच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र पावसाची स्थिती निर्माण झाली असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने जळगाव जिल्ह्याला पुढील तीन तासासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट –
जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात आज सकाळपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. अशातच सकाळापासून जोरदार 19 किमी प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन तासांसाठी जळगाव जिल्ह्यास रेड अलर्ट असल्याचे कळविले आहे. दरम्यान, सर्व संबंधित यंत्रणेसह नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले असून सर्व यंत्रणांना तयारीत राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी घ्यावयाच्या खबरदारी:
1. विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास शक्यतो घरातच राहावे. सुरक्षित निवारा नसल्यास सखल जागा निवडून गुडघ्यात डोके घालून बसावे.
2. विजा चमकत असताना उघड्यावर, छतावर, गॅलरीत अथवा झाडाजवळ थांबू नये.
3. घरातील विद्युत उपकरणे त्वरित बंद करावीत.
4. विजेचे खांब, तारांचे कुंपण आणि लोखंडी वस्तूंना स्पर्श करू नये.
5. पाण्यात उभे असल्यास त्वरित कोरड्या जागी जावे.
टाळावयाच्या कृती:
1. विजा चमकत असताना लँडलाईन फोन, शॉवर, नळ, पाईपलाइन किंवा अन्य विद्युत उपकरणांचा वापर करू नये.
2. धातूच्या तंबूत अथवा शेडखाली आसरा घेऊ नये.
3. उंच झाडांखाली थांबू नये.
4. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ थांबणे टाळावे.
5. उघड्या दरवाजातून किंवा खिडकीतून विजेचा प्रकाश पाहण्याचा मोह टाळावा.
जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकृत शासकीय सूत्रांकडूनच माहिती मिळवावी. आपत्कालीन स्थितीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी यांनी आवर्जून सांगितले आहे.
राज्यात आजपासून पुढील तीन दिवस पावसाचे –
राज्यात यंदा मान्सूनचे आगमन सुद्धा लवकर झाले असून मे महिन्यातच महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस पडतोय. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने आज 28 मे पासून ते 30 मे पर्यंत म्हणजेच पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुसळधार पावसाची शक्यता ही कोकण आणि घाटमाथ्यावर जास्त वर्तवण्यात आली आहे.