चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 1 जून : राज्यात महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर कृषीमंत्रीपदाची जबाबदारी अजित दादांच्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते तथा दिंडोरी मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आली. दरम्यान, कृषीमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांबाबत आतापर्यंत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते वादात सापडले. यावरून अनेकदा त्यांच्या राजीमान्याची देखील मागणी करण्यात आली.
राज्याचे कृषीमंत्री पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात –
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे काल शनिवार 31 मे रोजी अ. भा. बळीराजा संघटना भारततर्फे छ्त्रपती संभाजीनगरमधील एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात बोलताना कृषिमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असून अजितदादांनी मला हे मंत्रिपद दिले, असे ते यावेळी म्हणाले.पण तसे जरी झाले तरी त्यामध्ये चांगल्यापद्धतीने काम करता येऊ शकते हे पण एक उदाहरण महाराष्ट्रात आपल्याला द्यायचे असल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले.
रोहित पवारांनी केली कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी –
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच कृषि विभागात सध्या काम कमी आणि केवळ बडबड जास्त असा प्रकार सुरु असल्याची टीकाही रोहित पवार यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची आतापर्यंतची वादग्रस्त वक्तव्ये कोणती?
1. “भिकारीही एक रुपया घेत नाही…” – पीकविमा योजनेवरील विधान
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये अमरावती येथे बोलताना “भिकारीही एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा देतो.” असे विधान केले होते. दरम्यान, या विधानामुळे शेतकऱ्यांची भिकाऱ्यांशी तुलना केल्याचा आरोप मंत्री कोकाटेंवर झाला आणि किसान सभा व इतर संघटनांनी तीव्र निषेध केला. परभणीत त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते.
2. कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांवर टीका –
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एप्रिल 2025 मध्ये नाशिकमध्ये बोलताना “कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का?” असा सवाल करत कर्जमाफीची रक्कम लग्नासाठी खर्च केली जाते असे विधान केले. दरम्यान, या विधानावरून शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला. नंतर कोकाटे यांनी माफी मागितली आणि शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची वेळच येऊ नये, ही सरकारची भावना असल्याचे स्पष्ठीकरण दिले.
3. कांद्याच्या दरावर शेतकऱ्यांना दोष –
कृषीमंत्री कोकाटे यांनी मे 2025 मध्ये कांद्याच्या दरावर बोलताना म्हटले की, “एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात आणि त्यामुळेच बाजारभाव पडतो. दरम्यान, कृषीमंत्र्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली.
4. “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” – विधानावर स्पष्टीकरण
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतंच नाशिकमध्ये 30 मे रोजी वादग्रस्त विधान केले होते. “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे विधान केले, ज्यामुळे वाद निर्माण झाला. नंतर त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या विधानाचा उद्देश ढेकळांचे पंचनामे करू नयेत असा नव्हता, तर निसर्ग आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे नीट परीक्षण करून वास्तव पंचनामे व्हावेत, असं स्पष्ठीकरण त्यांनी दिलं.
5. कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी
कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे. अजितदादांनी मला हे मंत्रिपद दिले, असल्याचे वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केलं.