चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाली (रायगड), 2 जून : जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील लासगाव गावाचे सुपूत्र तसेच सध्या रायगड जिल्ह्यातील पाली येथील रहिवासी असलेले साजिद लुखमान शेख हे भारतीय सैन्यदलातील आपल्या 16 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. भारतीय सैन्यदलातील त्यांनी दिलेल्या सेवाकार्याला सलाम म्हणून त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
रायगड जिल्ह्यातील पाली येथे हे आयोजन करण्यात आले. यावेळी काल रविवारी 1 जून रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास पाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक ते खालचा मोहल्ला पर्यंत भव्य अशी सेवापूर्ती गौरव मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूक साजिद शेख यांचे अनेकांनी औक्षण करत त्यांचा सन्मान केला. तसेच त्यांचे स्वागत केले. सर्वात प्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने देशप्रेमी नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला. सेवापूर्ती सोहळ्याच्या या मिरवणुकीत यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला.


साजिद शेख यांच्याबाबत –
साजिद शेख हे भारतीय सैन्यदलात 16 वर्षांपूर्वी भरती झाले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात आसाम, लडाख, जम्मू याठिकाणी सेवा बजावली. तसेच ते Bombay Engineer group/ 236 IWT( inland water transport) मध्ये कार्यरत होते. त्यांचे वडील लुखमान हे शेख हे मागील 40 वर्षांपासून पाली येथे वास्तव्यास आहेत. आपला जळगाव हा जिल्हा सोडून ते रायगड येथे राहायला गेले असताना त्यांनी तिथे सर्व जाती धर्मातील लोकांशी अत्यंत प्रेमाने संबंध प्रस्थापित केले आणि आपल्या मुलांनाही सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. त्यामुळे आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत या मुस्लिम कुटुंबाने आज तिथे आपली अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या या वागणुकीच्या प्रेमापोटीच लुखमान शेख यांचे द्वितीय चिरंजीव साजिद शेख यांच्या या सेवापूर्ती सोहळ्याला सर्व जाती धर्मातील बांधव देशप्रेमी नागरिक उपस्थित होते. यावेळी साजिद शेख यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी साजिद शेख यांचे आई-वडील, त्यांच्या पत्नी-मुलगी, तसेच दोन्ही भाऊ, कुटुंबातील इतर सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
