जळगाव, 2 जून : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमढी येथील एका आदिवासी महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाल्याची घटना समोर आली होती. यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत याप्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना केली आहे. तर दुसरीकडे या घटनेवरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटलंय? –
प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, जळगाव जिल्ह्यातील एका आदिवासी महिलेला रस्त्यावरच बाळंतपण करावं लागलं. कारण, ना त्या महिलेला रुग्णवाहिका मिळाली, ना वैद्यकीय मदत. या वेदनादायक प्रसंगानंतर अजून एक घटना घडली, ते अधिक भयावह होतं. त्या नवजात बाळाची नाळ कापण्यासाठी दगडाचा वापर करावा लागला. दरम्यान, ही घटना केवळ दुःखद नाही, तर ही अनेक दशकांच्या राजकीय अपयशाची लाजीरवाणी खालची पातळी आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.
फक्त वोट बँक उभी केली –
भाजपच्या नेतृत्वाखालील सध्याच्या सरकारने विकासाचे कितीही गाजर दाखवले, तरी आदिवासी आणि वंचितांसाठी मूलभूत आरोग्य सेवा पुरवण्यात ते पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कोणतेही सरकार असो, वंचितांसाठी आरोग्य व्यवस्था सुधारण्याऐवजी त्यांनी पिढ्यानपिढ्या फक्त वोट “बँक” बनवली असून दवाखाने बनवले नाहीत, फक्त वोट बँक उभी केली असल्याची टीकाही त्यांनी केलीय.
मानवतेचा अपमान –
दरम्यान, आज आरोग्य हक्क नसून फक्त घोषणांचं साधन राहिलं आहे. आणि त्याची किंमत कोण चुकवतं? तर वंचित समूह! ज्यांच्या हाती वैद्यकीय साधने असायला हवीत, त्यांच्या हाती आजही दगड आहेत. हा अपमान फक्त त्या महिलांचा नाही, तर मानवतेचा आहे! लाज वाटावी अशी बाब आहे ही, असा प्रहार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील एका आदिवासी महिलेला रस्त्यावरच बाळंतपण करावं लागलं. कारण, ना त्या महिलेला रुग्णवाहिका मिळाली, ना वैद्यकीय मदत.
या वेदनादायक प्रसंगानंतर अजून एक घटना घडली, ते अधिक भयावह होतं. त्या नवजात बाळाची नाळ कापण्यासाठी दगडाचा वापर करावा लागला!
ही घटना केवळ दुःखद नाही,… pic.twitter.com/StENaw4jEQ
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 29, 2025
नेमकी घटना काय? –
चोपडा तालुक्यातील बोरमढी येथील एका आदिवासी महिलेची भर रस्त्यात प्रसूती झाल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या कर्जाने उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात घडली. संबंधित महिला पतीसह दुचाकीवरून उपकेंद्रात येत असताना वाटेतच प्रसववेदना सुरू झाल्याने रस्त्यातच बाळाचा जन्म झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने त्वरीत हालचाल करून आरोग्य पथकासह संबंधित भागात भेट दिली. याप्रकरणी सध्या स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
हेही वाचा : पहिलीपासून विद्यार्थ्यांना मिळणार सैनिक प्रशिक्षण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा, नेमकी बातमी काय?