जळगाव, 3 जून : जळगाव शहरातील समता नगर नागेश्वर कॉलनी परिसरात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. यासोबतच तर 14 जण जखमी झाल्याची घटना रविवारी 1 जून रोजी समोर आली. यावरून जळगाव महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात असताना आज ठाकरेंच्या शिवसेनेच्यावतीने महापालिका आयुक्तांच्या दालनात धडक देण्यात आली. यावेळी लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली.
ठाकरेंच्या शिवसेनेचे अनोखे आंदोलन –
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या संचारामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांनी संताप व्यक्त केला असून आज दुपारी माजी महापौर कुलभूषण जाधव यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी प्रतिमात्मक कुत्र्यांसह जळगाव शहर महानगर पालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या दालनात धडक दिली. यावेळी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासोबत संवाद साधताना कुलभूषण जाधव यांच्यासह उपस्थितांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली.
महापालिका आयुक्तांना धरले धारेवर –
कुलभूषण जाधव म्हणाले यांनी महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना धारेवर धरत सांगितले की, मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे. जळगाव शहरातील प्रत्येक नागरिक हा कर भरतो आणि म्हणून त्याला सुविधा आणि संरक्षण देण्याचे काम हे महापालिकेचे आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून श्वानांवरती कुठलाही प्रतिबंध होत नसल्याचा आरोप करत याची चौकशी दिले पाहिजे. ज्या कत्रांटदाराला हे कत्रांट दिले होते, त्याची देखील चौकशी झाली पाहिजे.
मुलाच्या कुटुंबियांना भरपाई मिळाली पाहिजे –
मनपा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चार वर्षीय बालकाला कुत्र्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला असल्याचा आरोपही जाधव यांनी केलाय. यामुळे मुलाच्या कुटुंबियांना भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी जाधव यांनी केलीय. दरम्यान, आम्ही केलेल्या मागणीची दखल न घेतल्यास आणि उपाययोजना न केल्यास जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून आणत महापालिकेच्या इमारतीत सोडण्याचा इशारा कुलभूषण जाधव यांनी आयुक्तांना दिलाय. तसेच होणाऱ्या परिणामास महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही ते म्हणाले आहेत.
मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू –
जळगाव शहरातील समता नगर नागेश्वर कॉलनी परिसरात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाल्याची घटना रविवारी 1 जून रोजी सायंकाळी घडली. अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड (वय ४) असे मयत बालकाचे नाव असून अरविंद हा बालक नागेश्वर कॉलनीत आई-वडिलांसोबत राहत होता. दरम्यान, अंगणात खेळत असताना या बालकावर अचानक रित्या कुत्र्याने हल्ला चढविला. यामध्ये बॉबीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाविरोधात जळगाव शहरातून संताप व्यक्त केला जातोय.