ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 28 जून : भारत देशामध्ये सर्व धर्म गुण्यागोविदांने राहतात. भारतीय समाजातील एकताच ही या देशाची ताकद आहे. याचाच प्रत्यय आणखी एकदा पाचोरा शहरात पाहायला मिळाला आहे. येत्या गुरुवारी म्हणजे उद्या 29 जूनला आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आहे. हिंदू आणि मुस्लीम बांधवांचे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंदू धर्मातील आषाढी एकादशीचा गुरुवारी असल्याने बकरी ईद दुसऱ्या दिवशी साजरा करण्याचा निर्णय पाचोरा शहरातील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. हिंदू धर्मातील लोकांच्या भावनेचा आदर करत बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देता दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जाईल, असे पाचोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले. यासंबंधीत पाचोरा शहरातील नूर मशिदीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तिथे हा निर्णय जाहीर करण्यात आला.
हेही वाचा – जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल आज पाचोऱ्या दौऱ्यावर, नागरिकांच्या प्रश्नांवर करणार चर्चा
यावेळी माजी नगरसेवक रसुल शेख, मतीन बागवान, महमुद चाबीवाले, वहाब बागवान, सय्यद तारीख, नाशीर खान, जाकीर खाटीक यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते. दरम्यान, पाचोरा शहरातील मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.