छत्रपती संभाजीनगर, 28 जून : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. खून, आत्महत्या, तसेच आर्थिक फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्रात एका महिला किर्तनकाराची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
ही घटना महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापुरातील एका आश्रमात घडली. वैजापूर येथील एका आश्रमात महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई महाराज यांची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, संगिताताई महाराज यांच्या हत्येची घटना ही शुक्रवारी 27 जून रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहेत. यामध्ये वैजापुरातील एका आश्रमात संगीताताई महाराज यांच्यावर मारेकऱ्यांनी थेट आश्रमात घुसून दगडाने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. तसेच घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात खूनांच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. मागील एका महिन्यात या तालुक्यात तीन खूनाच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता ह.भ.प. संगिताताई महाराज या किर्तनकार महिलेची हत्या करण्यात आली आहे. हत्येच्या या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून ही हत्या नेमकी का झाली आणि कोणी केली? याचा शोध पोलीस घेत आहेत. आता या प्रकरणात नेमके काय खुलासे होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.