यावल (जळगाव), 1 जुलै : खान्देशातील अनेक सुपूत्रांनी महाराष्ट्रात, देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे. त्यातच आता खान्देशातील आणखी एका सुपूत्राने आपल्या खान्देशचे नाव मोठे केले आहे. खान्देशच्या जळगाव जिल्ह्यातील यावलचे सुपूत्र डॉ. नितीन मधुकर कुलकर्णी यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत.
डॉ. नितीन मधुकर कुलकर्णी यांच्याबाबत –
यावलचे सुपूत्र डॉ. नितीन मधुकर कुलकर्णी यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. डॉ. नितीन कुलकर्णी यांनी यावल येथील तारकेश्र्वर विद्या मंदिर, सरस्वती विद्या मंदिरातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिक्षण घेतले. यानंतर जळगावच्या मू. जे. महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यावर पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी पूर्ण केली. तसेच यानंतर पुण्यातीलच फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापन सुरू केले. उप प्राचार्य म्हणून यशस्वीपणे जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
हेही वाचा – खान्देशकन्येची बाजी! पाचोऱ्याच्या विशाखाला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 जाहीर
डॉ. नितीन कुलकर्णी यांचे वडील दिवंगत मधुकर बळवंत कुलकर्णी हे सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांच्यानंतर आता त्यांच्या मुलाने म्हणजे डॉ. नितीन कुलकर्णी यांनी प्राचार्य पद मिळवले आहे. डॉ. नितीन कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आणि नाशिक लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांचे बंधू आहेत. अभ्यासू, संयमी, सुशील आणि परिपक्व असलेल्या दादांनी प्रचंड कष्ट, प्रामाणिकपणा या गुणांनी हे शिखर गाठले. त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे, असे मिलिंद कुलकर्णी म्हणाले.
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाबाबत –
पुणे शहराला शिक्षणाचं माहेरघरं म्हटलं जातं आणि याच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असे कॉलेज आहे. स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर तसेच भारताचे माजी पंतप्रधान व्हीपी सिंग, पी. व्ही. नरसिंहराव, पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहे. इतकेच नव्हे तर पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, थोर सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल रामजी शिंदे, ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, अभिनेत्री स्मिता पाटील, सोनाली कुलकर्णी हे सुद्धा या कॉलेजचे विद्यार्थी राहिले आहे.