रावेर, 8 जुलै : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना रावेर तालुक्यातून आणखी एक लाचप्रकरण समोर आले आहे. रावेर तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाच्या महिला शिक्षिकेची प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी 36 हजारांची लाच घेताना मुख्याधापिकेसह लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. लाचप्रकरणातील मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन, (वय- 57 वर्ष) आणि कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (वय-27 वर्ष) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार यांची सून ही जनता शिक्षण मंडळ खिरोदा ता.रावेर या संस्थेच्या धनाजी नाना विद्यालय या शाळेत कायमस्वरूपी उपशिक्षिका या पदावर कार्यरत आहे. तक्रारदार यांच्या सुनेने प्रसूती रजा मिळण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रासह 2 जून रोजी मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांच्याकडे अर्ज दिला होता.
प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी –
दरम्यान, तक्रारदार यांच्या सुनेच्या सांगण्यावरून त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांची भेट घेऊन त्यांच्या सुनेच्या प्रसूती रजेच्या अर्जाबाबत विचारणा केली. यावेळी महाजन यांनी प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी प्रति महिना 5,000/- रुपये प्रमाणे सहा महिन्यांच्या रजा मंजुरीसाठी तक्रारदार यांच्याकडे एकूण 30,000/- रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदार यांनी 7 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रोजी तक्रार दिली.
अन् एसीबीने रचला सापळा –
यानंतर धुळे एसीबीने सापळा रचलेल्या सापळ्यात यामध्ये मनीषा महाजन यांनी 36,000/- रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारून लिपिक आशिष पाटील हा मोजत असताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात सावदा पोलीस स्टेशनमध्ये भ.प्र.अधिनियम कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई –
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, पोलीस हवालदार राजन कदम, पोलीस हवालदार मुकेश अहिरे, पोलीस हवालदार पावरा, पोलीस कॉन्स्टेबल रामदास बारेला, चालक पोलीस हवालदार मोरे, चालक पोलीस कॉन्स्टेबल बडगुजर आदी पथकाने लाचप्रकरणी ही कारवाई केली.