पुणे, 1 ऑगस्ट : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील महायुती सरकारच्या राष्ट्रवादी अजित दादा गट तसेच शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री त्यांच्या कृतीमुळे वादात सापडले होते. यावरून विरोधकांकडून सरकारवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील मंत्र्यांना इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी सरकारमधील मंत्र्यांनी भविष्यात कुठलेही वादग्रस्त वक्तव्ये तसेच बेशिस्त वर्तन करू नये. तसेच बेशिस्त वर्तवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
माणिकराव कोकाटेंच्या खात्यात बदल –
वादग्रस्त वक्तव्ये तसेच विधान परिषदेतील व्हायरल झालेल्या रमी व्हिडिओ प्रकरणी माणिकराव कोकाटे यांचे खाते बदल करण्यात आले असून त्यांना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औेकाफ हे खाते देण्यात आले आहे. तर दुसरीकडे दत्ता भरणे यांना राज्याच्या कृषीमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना सांगितले की, जी काही घटना घडली त्या घटनेनंतर मोठा रोषा होता. त्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती निर्णय घेतला. त्यानुसार त्यांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे आणि कृषी खाते दत्ता भरणे यांना देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा –
भविष्याच्या काळात मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्यं करू नयेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधील मंत्र्यांना दिली असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आता जर कोणी अशाप्रकारे बेशिस्त वर्तवणूक करेल तर त्यांच्यावर कारवाई करू, अशा सूचना आम्ही तिघांनी दिल्या आहेत. दरम्यान, खातेबदलाबाबत आता कुठेही बदल केला जाणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ठ केले.
धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाबाबत कुठलीही चर्चा नाही –
आम्ही जनतेच्या सेवेसासाठी आले असून आमच्या वर्तनावर जनतेचे लक्ष असतं. त्यासाठी मंत्र्यानी आपल्या वागण्यावर तसेच बोलण्यावर आंकूश ठेवण्याचे गरज असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी माझी तीन वेळा भेट घेतली. या भेटींमध्ये त्यांच्या मंत्रीपदाबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. मंत्रीमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही. मंत्रीमंडळाची चर्चा ही अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर केली जाते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.