ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 5 ऑगस्ट : पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) येथील माध्यमिक विद्यालयात ‘वृक्षदिंडी’ चे आयोजन करण्यात आले. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती” या अभंगा प्रमाणे वृक्षांचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्त्व असून हा संदेश वृक्ष दिंडीतून देण्यात आला. यावेळी पालखी वृक्षांनी सजवून पालखीची संपुर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान, या वृक्ष दिंडीमध्ये वारकरी संप्रदायातील पिंप्री गावातील भजनी मंडळ, शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी, गावकरी सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा साकारली होती. वृक्षांचे महत्व सांगणाऱ्या फलकांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
यासोबतच पिंप्री (सार्वे) येथील महाविद्यालय तसेच गावातील परिसरात 200 वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचे गावकऱ्यांनी तोंड भरून कौतुक करत यामध्ये ते सहभागी झाले. ही वृक्षदिंडी यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
वृक्ष लावगडीमुळे परिसरात हरित पट्टा वाढून पर्यावरणात्मक समतोल राखण्यास मदत होणार आहे. तसेच झाडांमुळे जमिनीची धूप थांबेल आणि पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी मदतशीर असेल. झाडांची सावली व थंडावा तापमान कमी करण्यास मदत होईल. हिरवळ मानसिक तणाव कमी करून मन प्रसन्न ठेवते. झाडांपासून लाकूड, फळे, औषधी वनस्पती मिळतात, त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही ते फायदेशीर ठरणार आहे.