नाशिक, 5 ऑगस्ट : मागील काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या असून आता या निवडणुकांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विभागीय आढावा बैठक घेतली. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आता दिवाळीनंतर अर्थात डिसेंबर तसेच जानेवारीमध्ये होणार असल्याची माहिती आता या बैठकीनंतर समोर आली आहे.
नाशिकमध्ये विभागीय बैठक –
राज्य निवडणूक आयोग मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी नाशिकमध्ये विभागीय बैठक घेण्यात आली. यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत हा आढावा घेण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार –
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत एकीकडे प्रतिक्षा लागली असताना ह्या निवडणुका आता दिवाळीनंतर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट मशीन वापरली जाणार नाही. तसेच निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत, अशी माहिती देखील राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.