पणजी, 12 ऑगस्ट 2025 : आसाम येथील लचित बोरफुकन पोलिस अकादमीमध्ये (LBPA) भरती झालेल्या गोवा राज्यातील 700 पोलीस प्रशिक्षणार्थींनी 43 आठवड्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले. यानिमित्त मंगळवारी (12 ऑगस्ट) पासिंग आउट परेड, शपथविधी, बक्षीस वितरण आणि ‘पँथर्स ऑन व्हील्स’ युनिटचे विशेष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काय म्हणाले? –
यावेळी मनोगत व्यक्त करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘आसाम सरकार आणि एलबीपीए यांनी कॅडेट्सना उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. प्रशिक्षणादरम्यान मी कॅडेट्सशी नियमित संपर्कात होतो. जेव्हा आमचे अधिकारी दुसऱ्या राज्यात प्रशिक्षण घेतात आणि नवीन कौशल्य आत्मसात करून परततात तेव्हा ती आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असते.
दरम्यान, या कार्यक्रमामुळे गोवा आणि आसाममधील बंध अधिक मजबूत झाला आहे. एवढेच नव्हे तर हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “अखंड भारत” या दृष्टिकोनाशी सुसंगत ठरला आहे. कायदा अंमलबजावणी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी गोवा-आसाम सहकार्याचा हा अभिमानास्पद परिणाम असल्याचेही सावंत यावेळी म्हणाले.
सहभागी कॅडेट्सनाही संबोधित करताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, ‘तुमचा जनतेशी जास्त संपर्क राहाणार असून तुमच्याकडून फक्त कायद्याचे पालन करणे एवढेच काम नसून सत्यनिष्ठा, करूणा, निष्पक्षपणाची अपेक्षा आहे. तुमचे वर्तन जनतेच्या मनात कायम आदर्शवत असले पाहिजे. यासाठी काम करताना इमानदारी, तत्परता, आणि संवेदनशीलता हे गुण वाढीस लागणे गरजेचे आहे. मला खात्री आहे, गेल्या 10 महिन्यात तुम्ही जे प्रशिक्षण घेतले त्याचा वापर तुम्ही गोव्यात आल्यानंतर योग्य पद्धतीने कराल. तुम्ही परिधान केलेली वर्दी ही फक्त एक कापड आणि बॅच नसून सन्मान, कर्तव्य आणि जबाबदारीचे प्रतिक आहे. आज तुम्हाला जे पदक, पुरस्कार प्राप्त झाले आहे, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. सरतेशेवटी मी आसाम पोलीस ट्रेनिंग सेंटरचे आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांचे गोवा सरकारच्या आणि गोमंतकियांच्या वतीने आभार मानतो.
एकूण 700 कॅडेट्स सहभागी –
या अकादमीमध्ये एकूण 700 कॅडेट्स सहभागी होते. त्यात 569 पुरुष सदस्य तर 131 महिला सदस्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व कॅडेट्सना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक लवचिकता, फील्ड रणनीती आणि शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच त्यांना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या भारतीय राखीव बटालियनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामुळे गोव्याशी दृढ बंध जुळले –
यावेळी बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले की या सोहळ्याचे मी कौतुक करतो. या कार्यक्रमामुळे आसाम, मणिपूर आणि गोव्यातील राज्य पोलिस दलांना एकाच वेळी प्रशिक्षण, सौहार्द आणि व्यावसायिक देवाणघेवाणीसाठी एकत्र आणले गेले. गोव्यातील कॅडेट्सच्या प्रशिक्षणामुळे दोन्ही राज्ये जवळ आली आहेत. गोवा आणि आसाममधील अंतर खूप मोठे आहे. परंतु येथील प्रशिक्षणामुळे गोवा सरकारने हे भौगोलिक अंतर कमी केले आहे. येथील तरुण विविध पदांवर किनारी राज्यात काम करत आहेत. जर त्यांना तेथे कोणत्याही मदतीची आवश्यकता असेल तर मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून त्यांना गोव्यात सर्वतोपरी सहकार्य मिळेल.
देशभरात अधिकारी वर्ग तयार करण्यात ‘एलबीपीए’चा सहभाग –
आसामचे डीजीपी हरमीत सिंग यांनी नमूद केले की, देशातील प्रमुख पोलिस प्रशिक्षण संस्थांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलबीपीएने यापूर्वी मणिपूरच्या 2000 पोलिस कॅडेट्सना प्रशिक्षण दिले होते आणि अलीकडेच भूतानकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची विनंती करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या दूरदृष्टीमुळे, एलबीपीए संपूर्ण भारतात विशिष्टतेने सेवा देणारे अधिकारी तयार करत असल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
या कार्यक्रमासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, आसामचे पोलीस अधिकारी हेमंत सिह, गोव्याचे पोलीसआयुक्त आलोक कुमार, बोरफुकन पोलिस अकादमीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : राज्यात महाराष्ट्र पोलीस दलात होणार 15 हजार मेगाभरती! मंत्री गिरीश महाजन यांनी दिली महत्वाची माहिती