पणजी, 15 ऑगस्ट 2025 : माहिती आणि प्रसिद्धी खाते आणि गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बहुचर्चित राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन काल गुरुवार 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आयनॉक्स चित्रपटगृहात करण्यात आले. या सोहळ्याला एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, भाजपचे अध्यक्ष दामू नाईक, अभिनेता मोहम्मद अली, माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे संचालक दीपक बांदेकर , आयएएस अश्विन चंद्रू यांची उपस्थिती लाभली होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काय म्हणाले? –
उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘गोव्याला कला आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा आहे. हीच परंपरा जगापुढे यावी या उद्देशाने सरकार प्रयत्नशील आहे. गोमंतकिय कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सरकार मनोरंजन क्षेत्राचा विकास करत असून हाच उद्देश ठेऊन राज्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मी एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा संस्थेच्या संचालकांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.
या महोत्सवात येऊन गोव्यातील कलाकारांनी चित्रपट बघावे, चित्रपटाचे तंत्र शिकावे, आणि त्यांच्यातील थिएटरचे कौशल्य वाढवावे. कोकणी, मराठीसारख्या स्थानिक भाषांचा विस्तार व्हावा, यासाठी सातत्याने या भाषेतील चित्रपटांची निर्मिती होणे गरजेचे आहे. अर्थात त्यासाठी एंटरटेंमेंट सोसायटी दरवर्षी सबसिडी आणि प्रोत्साहनपर पुरस्कार देत असते. गेली 75 वर्षे चित्रपट महोत्सव सुरु असून आमच्या चित्रपटांना कधी नॅशनल तर कधी ऑस्कर पुरस्कारही मिळाल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री सावंत यांनी काढले.
कार्यशाळा, चर्चासत्रांचा लाभ घ्या –
गोव्यासारख्या लहान राज्यात गेली 20 वर्षे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येतो. या महोत्सवात सहभागी होण्याऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांकडून देखील आम्हाला शिकायला मिळते. आजपासून सुरु होत असलेला हा महोत्सव म्हणजे चित्रपट क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी एक योग्य मंच आहे. पुढील चार दिवस या संधीचा लाभ गोव्यातील कलाकारांनी घ्यावा. सिनेकलावंत, चित्रपट निर्माते स्क्रीनिंग करण्यासाठी, कार्यशाळा, चर्चासत्र घेण्यासाठी सहभागी होणार असून त्यांच्याकडून देखील कलाकारांनी खूप काही शिकण्यासारखे मिळाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अपरिचीत गोवा स्क्रीनवर दाखवा –
बालभवनच्या माध्यमातून कलाकार घडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गोव्यातील कलाकारांकडे टॅलेंट असून त्यावर फिनिशिंग होण्याची गरज आहे. गोवा एक क्रिएटिव्ह कॅपिटल आहे. मात्र, त्यासाठी चित्रपट संस्कृती रूजणे आवश्यक आहे. अर्थात याकामी सरकार नेहमी प्रयत्नशील आहे. गोवा म्हणजे फक्त समुद्र किनारे नव्हे. तर त्यापलिकडेही गोवा वसलेला असून राज्यात निसर्गसौंदर्याने नटलेला परंतु अपरिचीत असलेला भाग चित्रपटाच्या माध्यमातून निर्माते- दिग्दर्शकांनी प्रेक्षकासमोर आणावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केले.
पुरस्कारांचे वितरण –
या महोत्सवातील फिचर फिल्म विभागात 21 पुरस्कार आणि नॉन फिचर फिल्म विभागात 7 पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्या पुरस्कारांमध्ये 19 फिचर फिल्म आणि 4 नॉन फिचर फिल्ममध्ये स्पर्धा आहे. 48 तासांच्या लघुपट स्पर्धेतील विजेत्यांची घोषणाही उद्घाटन सोहळ्यादरम्यानच करण्यात येणार आहे.