नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 मंजूर होताच लोकप्रिय ऑनलाइन फँटसी गेमिंग अॅप ड्रीम 11 मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता ड्रीम 11 वर पैसे लावून खेळले जाणारे कॅश गेम्स आणि कॉन्टेस्ट पूर्णपणे थांबवण्यात आले आहेत.
Dream 11 कडून अधिसूचना जारी –
ड्रीम 11 ने आपल्या युजर्सना कळवले आहे की, आधी जमा केलेले डिपॉझिट बॅलेन्स आणि जिंकलेली रक्कम सुरक्षित आहे आणि ती कधीही काढता येईल. मात्र, आता युजर्सना फक्त ‘फ्री कॉन्टेस्ट’चा पर्याय उपलब्ध राहणार आहे. या निर्णयामुळे तब्बल 28 कोटी युजर्सना धक्का बसला आहे. कंपनीचे वार्षिक उत्पन्न जवळपास 9,600 कोटी रुपये इतके होते.
ड्रीम इलेव्हनमध्ये पैसे लावता येणार नाहीत –
कॅश गेम आणि कॉन्टेस्ट या ड्रीम इलेव्हनमधून बंद करण्यात आले आहेत, त्यासोबतच युजर्स जिंकलेले पैसे आणि डिपॉझिट बॅलेन्स हे सुरक्षित असून ते आपण कधीही काढू शकता, असं सुद्धा ड्रीम 11 कडून सांगण्यात आला आहे. त्यामुळे आता करोडो ड्रीम इलेव्हन युजर्स ड्रीम इलेव्हन कॅश कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत किंवा ड्रीम इलेव्हनमध्ये पैसे लावू शकणार नाहीत.
संसदेत विधेयक पारित –
ऑनलाइन गेमिंग विधेयक आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी राज्यसभेतही मांडण्यात आले. राज्यसभेत ऑनलाइन गेमिंग विधेयक 21 ऑगस्ट रोजी आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. दरम्यान, ऑनलाईन गेम प्रचार आणि नियमन विधेयक 2025 लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेतही पारित झाले असून लवकरच राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवले जाणार आहे.
बीसीसीआयला मोठा तोटा –
ड्रीम 11 गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्येही प्रायोजक म्हणून सक्रिय झाली होती. 2023 मध्ये बीसीसीआयसह 358 कोटी रुपयांचा करार करून कंपनी टीम इंडियाची टायटल प्रायोजक बनली होती. हा करार 2026 पर्यंत होता. मात्र, आता विधेयकामुळे या कराराचे भवितव्य धोक्यात आले आहे. बीसीसीआयला या रकमेपैकी निम्म्याहून अधिक रक्कम आधीच मिळाली असली तरी उर्वरित निधी करार पूर्ण होतो की नाही यावर अवलंबून राहील.