जळगाव, 24 ऑगस्ट : निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई या शेतकरी कष्टकऱ्याच्या भावना काव्यातून बोलणारा आवाज होत्या. त्यांच्या नावाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भव्य पुतळा उभारणीचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ११ ठिकाणी ‘बहिणाई मार्ट’ सुरू करण्यात आले असून आसोदा येथे स्मारक उभारणीचे काम सुरू आहे. मला सार्थ अभिमान आहे की मी बहिणाबाईंच्या गावच्या, त्यांच्या मतदारसंघातील जनतेचा प्रतिनिधी आहे. बहिणाबाई हे कष्टकरी जनतेचे प्रेरणास्थान असून त्यांच्या कार्याची स्मृती पिढ्यान्पिढ्या जागी ठेवणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची १४५ वी जयंती आसोदा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बहिणाबाईंच्या पुतळ्याला हार घालून वंदन करण्यात आले.
यानंतर गावातील सार्वजनिक विद्यालय आसोदा शाळेतील विद्यार्थ्यांनी बहिणाबाईंच्या कवितांवर आधारित नृत्य व सजीव देखावे सादर केले. “अरे संसार संसार, आज माहेराला जाणं माझी माय सरसोती” अशा अनेक कवितांवरील नृत्य सादरीकरण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला दाद दिली. शिक्षिका शुभांगी महाजन, जागृती चौधरी व कोल्हे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या कलाकृतींचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तोंडभरून कौतुक केले व विद्यार्थिनींना बक्षिसेही दिली.
या कार्यक्रमाला उपसरपंच सुनील पाटील, गिरीश भोळे, चंदन बिऱ्हाडे, जीवन सोनवणे, शरद नारखेडे, विजय कोल्हे, अनिल कोळी, अजय महाजन तसेच समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी, बंडू भोळे, संजीव पाटील, महेश भोळे, संजय महाजन, नितीन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी यांनी केले तर आभार बंडू भोळे यांनी मानले.