बुलढाणा, 27 ऑगस्ट : विदर्भाच्या बुलढाण्यातील शेतकरी पूत्र आणि एकलव्य इंडिया फाऊंडेशनचे संस्थापक, सीईओ राजू केंद्रे यांना अत्यंत प्रतिष्ठित असा ब्रिटिश कौन्सिलने ग्लोबल स्टडी यूके अल्युम्नी अवॉर्ड 2025 जाहीर झाला आहे.
ब्रिटिश कौन्सिलने ग्लोबल स्टडी यूके अल्युम्नी अवॉर्ड 2025 चे विजेते जाहीर केले आहेत. जे तरुण युकेमधून शिक्षण घेऊन आपल्या समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत आहेत, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान केला जातो.
यंदा 11 व्या वर्षी या पुरस्कारांसाठी 100 हून अधिक देशांतील 130 पेक्षा जास्त युके विद्यापीठांचे माजी विद्यार्थी अशा तब्बल 1,300 अर्ज प्राप्त झाले होते. 2025 मध्ये फ्रान्स, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, तुर्की, अमेरिका यांसारख्या 23 देशांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील सोहळे पार पडले.
या जागतिक विजेत्यांमध्ये राजू केंद्रे, संस्थापक आणि सीईओ – एकलव्य इंडिया फाउंडेशन व SOAS, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन चे माजी विद्यार्थी यांचा समावेश आहे. त्यांना सामाजिक कृती (Social Action) या श्रेणीत हा पुरस्कार मिळाला असून ते या यादीतील एकमेव भारतीय आहेत. या जागतिक पुरस्काराचा सार्वजनिक सोहळा मे 2026 मध्ये वरिष्ठ ब्रिटिश कौन्सिल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येईल. दरम्यान, याआधी मार्च 2025 मध्ये दिल्लीतील ब्रिटिश कौन्सिलच्या राष्ट्रीय सोहळ्यात राजू केंद्रे यांना नॅशनल अल्युम्नी अवॉर्डही प्रदान करण्यात आला होता.
वंचितांसाठी शिक्षण परिवर्तनाची चळवळ –
भटक्या आदिवासी समाजातील स्वतःच्या जीवनानुभवातून प्रेरणा घेऊन राजू केंद्रे यांनी ग्रामीण व आदिवासी भागातील पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली करून देण्याचे काम हाती घेतले आहे. 2017 मध्ये एकलव्य इंडिया फाउंडेशन ची स्थापना झाल्यापासून त्यांनी –
- 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती करत त्यांना मार्गदर्शन केले आहे.
- 2,000 हून अधिक विद्यार्थ्यांना 100+ नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांत प्रवेश मिळवून दिला आहे.
- वंचित विद्यार्थ्यांसाठी 7 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिल्या आहेत.
- तसेच 600 माजी विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी जाळे उभे केले आहे, जे आपल्या भागातील नव्या पिढ्यांना दिशा दाखवत आहेत.
एकलव्यच्या ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम अंतर्गत 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत प्रवेश मिळाला आहे, तर 60 हून अधिक विद्यार्थ्यांनी Chevening, Commonwealth, Erasmus+ यांसारख्या पूर्ण शिष्यवृत्तीसह हार्वर्ड, ऑक्सफर्ड, लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया यांसारख्या नामांकित संस्थांत उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळवली आहे. नेतृत्व, समानता व संधी यांना प्रोत्साहन देणारे एक आंतरविषयक विद्यापीठ मध्य भारतात स्थापन करावे, असा राजू केंद्रे यांचा दीर्घकालीन संकल्प आहे.
या सन्मानाबाबत राजू केंद्रे म्हणाले, “वर्ष 2021-22 माझ्यासाठी एक महत्वाचा टप्पा होता. SOAS, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथे शिक्षण घेणे व Chevening शिष्यवृत्ती मिळणे यामुळे माझ्या वैयक्तिक प्रवासाबरोबरच एकलव्य इंडिया फाउंडेशनच्या कामाला मोठा हातभार लागला. उच्च शिक्षणाचे लोकशाहीकरण करणे आणि वंचित समुदायांतील विद्यार्थ्यांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे यासाठी अजून बरेच काही करायचे आहे. आमचे ध्येय असे आहे की वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थी केवळ उच्च शिक्षण घेणार नाहीत, तर भविष्यात धोरणनिर्माते आणि निर्णय घेणारे नेते म्हणून पुढे येतील. या सन्मानामुळे आम्हाला या दिशेने आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल. हा पुरस्कार मी सर्व पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना समर्पित करतो.”