चाळीसगाव, 27 ऑगस्ट : गेल्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्ह्यात खुनाच्याही घटना वाढताना दिसत आहेत. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
प्रभाकर चौधरी असे हल्ला झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार करण्यात आले. त्यामुळे या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे प्रभाकर चौधरी हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रात्रीच्या सुमारास वैष्णवी साडी सेंटर जवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवले आणि यावेळी त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सध्या पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. तसेच हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भागांमध्ये पथके रवाना करण्यात आली आहे.
प्रभाकर चौधरी हे चाळीसगावमध्ये भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. दोन दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. दरम्यान, आता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला कुणी आणि का केला? यामागचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नाही. त्यामुळे पोलीस या घटनेचा कसुन तपास करत आहेत.
मागच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये सुद्धा चाळीसगावात भाजपच्या एका माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. चार ते पाच अज्ञात तरुण तोंडाला रुमाल बांधून आले होते आणि त्यांनी बाळू मोरे त्यांच्यावर गोळीबार केला होता. यानंतर आता प्रभाकर चौधरी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेचा जिल्हा भाजपाकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात असून जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.