पणजी, 5 सप्टेंबर : आपल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, या भावनेने शिक्षक वर्ग काम करत असून समाज घडवण्यात शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे गौरवोद्रागार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. शिक्षण संचालनालयाकडून देण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री वसिष्ठ गुरु पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पणजी येथील कला अकादमीमध्ये करण्यात आले होते, या पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे , ‘एससीआरटी’च्या मेघना शिरगांवकर ‘समग्र शिक्षण’चे शंभू घाडी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘म्हजी लॅब बरी लॅब’ हा पुरस्कारही यावेळी प्रथमच देण्यात आल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
• सरकारी शाळा: गुणवत्ता आणि उज्ज्वल भविष्याचा पाया
पालकांनी सरकारी शाळांकडे सकारात्मकतेने पाहावे. समाजाच्या विकासासाठी सरकारी शाळांचा सन्मान राखणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. या सरकारी शाळांमध्ये ट्रेन केलेले शिक्षक असून नुकतेच काही शिक्षकांना बंगळुरु येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे ट्रेनिंग देण्यात आले आहे. विद्या समीक्षा केंद्राद्वारा राज्यभरातील शाळांवर लक्ष ठेऊन मार्गदर्शन केले जात असल्याचे सावंत यांनी सांगितले.
• प्राथमिकपासून व्यावसायिक शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती
शिक्षण घेत असताना आर्थिक समस्या निर्माण होऊ नये यासाठी सीएम स्कॉलरशीप पोर्टल स्कॅन केल्यास त्यावर प्राथमिकपासून व्यावसायिक शिक्षणापर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे. एसी, एसटी, ओबीसी तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. कोडींग आणि रोबोटिक शिक्षण देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सध्या सायबर सुरक्षेसारखे विषयांचे शिक्षण देण्यासही सुरुवात केली आहे.
• ज्ञानाबरोबर जीवनमूल्ये देणे ही शिक्षकांची खरी ताकद
बेब्रास इंडिया चॅलेंग २०२४ यामधून २२ विद्यार्थी देशभरत टॉप रँकिंगमध्ये आहेत. तसेच बाळ्ळीच्या सरकारी शाळेतील मुलाला जपानमध्ये जाण्याची संधी मिळते याचे श्रेय शिक्षकांनाच आहे. जो विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या मागे राहतो, त्यालाही कौशल्यांच्या आधारे पुढे नेण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रसंगी सांगितले.
• विकसित गोव्यासाठी शिक्षकांचे योगदान
निवृत्तीनंतर शिक्षकांनी अपडेट राहणे गरजेचे. मुलांचे पालकांपेक्षाही शिक्षाकांशी जवळचे नाते असते. शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी रोलमॉडेल असतो. विकसित भारत २०४७ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न साकारताना विकसित गोवा २०३७ हे उद्दीष्ट गाठणे यात शिक्षकांचा महत्वाचा वाटा असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.