मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. या मालिकेतील हा चौथा लेख.
राज्यात नव्या राज्यपालांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपती भवनाकडून झाल्यावर राज्य शासनाचा राजशिष्टाचार विभाग व राजभवन यांना एकाच वेळी दोन गोष्टी कराव्या लागतात: एकीकडे नव्या राज्यपालांचे आगमन, स्वागत व शपथविधी सोहळ्याचे नियोजन; तर दुसरीकडे मावळत्या राज्यपालांचा निरोप समारंभ व मानवंदनेची (गार्ड ऑफ ऑनर) तयारी!
नवनियुक्त राज्यपालांच्या स्वागत, मानवंदना व शपथविधीचा जसा राजशिष्टाचार असतो तसाच मावळत्या राज्यपालांना निरोप देण्याचा देखील राजशिष्टाचार असतो. राज्यपालांचा निरोप समारंभ बरेचदा अतिशय भावनिक सोहळा होतो. याचे कारण असे की, राज्यपाल पदावरील व्यक्तीने काही वर्षे ज्या राज्यात घालवली असतात, राज्यातील जनतेमध्ये व्यतीत केली असतात, त्यांच्या समस्या तसेच विविध जिल्ह्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला असतो; ज्या मंत्रिपरिषदेसोबत, विरोधी पक्ष नेत्यांसोबत, लोकनियुक्त प्रतिनिधींसोबत काम केले असते; अशा सर्वांचा त्या दिवशी निरोप घ्यावा लागत असतो.
दुसरी गोष्ट म्हणजे राज्यपाल पदावरील व्यक्तीचे राज्यातील वास्तव्यात राजभवनातील अधिकारी – कर्मचारी व सेवकवर्ग यांचेसोबत देखील कुटुंबप्रमुख या नात्याने ऋणानुबंध तयार झाले असतात. त्या नात्यांच्या बंधातून देखील निरोपानंतर मोकळे व्हावे लागते.
तिसरे म्हणजे राजभवनातील ज्या वास्तूमध्ये राज्यपालांनी स्वतःच्या कुटुंबीयांसहीत आपल्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात वास्तव्य केले असते, त्या वास्तूदेवतेचा देखील निरोप घ्यावा लागतो. राज्यपालांचा निरोप सोहळा हा आपसूकच त्यांच्या कुटुंबियांचा देखील निरोप सोहळा ठरतो. त्यामुळे राज्यपालांच्या घरच्या प्रत्येक सदस्याकरिता देखील निरोप समारंभ अतिशय भावनिक सोहळा असतो.
मावळत्या राज्यपालांना निरोप व नव्या राज्यपालांचा शपथविधी या दोन सोहळ्यांमध्ये बरेचदा फार कमी दिवसांचे अंतर असते. कधी कधी सकाळी मावळत्या राज्यपालांचा निरोप व संध्याकाळी नवनियुक्त राज्यपालांचा शपथविधी असेही होते. त्यामुळे काही वेळा जाणाऱ्या व्यक्तीला अल्पावधीतच सर्व बंध सोडून जावे लागते आणि ही गोष्ट थोडी कष्टदायी असते.
‘अशी’ होते निरोप समारंभाची तयारी –
नव्या राज्यपालांच्या आगमनाची तारिख व शपथविधीची वेळ ठरली की मावळत्या राज्यपालांशी विचारविनिमय करुन त्यांच्या राजभवनातून प्रस्थानाची तारिख, वेळ जाणून घेतली जाते. त्यानुसार मुख्य सचिव तसेच राजशिष्टाचार विभागाला कळवले जाते. अर्थात निरोप समारंभ हवा की नको, त्यासाठी वेळ आहे की नाही, ही त्या पदावरील व्यक्ती स्वतः ठरवते.
परंतु, सर्वांना अनुकूल असल्यास, राज्य मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यपालांच्या निरोप – सत्काराचे आयोजन केले जाते. अश्या सत्कार सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री विधानसभेचे अध्यक्ष, परिषदेचे सभापती, वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात. कधी केवळ अनौपचारिक गप्पा होतात, तर कधी राज्यपालांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे तसेच त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार असे त्या कार्यक्रमाचे रुप असते.
याशिवाय, एक कौटुंबिक निरोप सोहळा राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचेकडून देखील आयोजित केला जातो. हा सोहळा देखील बराच भावनिक होतो.
नौदलातर्फे मानवंदना–
प्रत्यक्ष राजभवन सोडून जाण्याच्या दिवशी नौदलातर्फे मावळत्या राज्यपालांना ‘गार्ड ऑफ हॉनर’ – मानवंदना देण्याची प्रथा आहे. त्यासाठी नौदलाच्या समारंभीय पलटणीला अगोदरच सूचित केले असते. त्यानुसार रेड कार्पेट टाकण्यात येते, राज्यपाल उभे राहतील त्या जागी राष्ट्रीय बोधचिन्ह असलेले पोडियम ठेवले जाते व मानवंदना देण्यासाठी नेव्हल बँडसह नेव्हीची समारंभीय पलटण उपस्थित राहते.
‘गार्ड ऑफ ऑनर’ची धनगंभीर धून वाजली की वातावरण अतिशय भावूक होते. नौदलाने सलामी दिल्यानंतर राज्यपाल राजभवन सोडतात व विमानतळाकडे प्रस्थान करतात. विमानतळावर देखील राज्यपालांना निरोप देण्यात येतो. परंतु राजशिष्टाचार तेथेच संपत नाही.
राज्यपालांचे परिसहाय्यक (ADC) त्यांना त्यांच्या घरी अथवा त्यांच्या नव्या नियुक्तीच्या ठिकाणापर्यंत सोडण्यास सोबत जातात. तेथे गेल्यावर मात्र राजशिष्टाचाराचा भाग संपतो. राज्यपाल हे पदावर असेपर्यंत त्यांना त्या राज्याचे ‘प्रथम नागरिक’ म्हणून संबोधले जाते. कार्यकाळ संपल्यानंतर मात्र त्यांचा त्या राज्याशी असलेला औपचारिक संबंध संपुष्टात येतो. मात्र त्या राज्यात त्यांना ‘राज्याचे अतिथी’ म्हणून पुढील आयुष्यभर राजशिष्टाचार देण्यात येतो.
राजभवन व राजशिष्टाचार विभागातील अधिकारी – कर्मचारी बदलत असतात. त्यामुळे निरोप समारंभासाठी एक ‘स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’ (SOP) तयार केलेले असते. त्यातील सूचनेनुसार मावळत्या राज्यपालांना राज्यपाल पदाचा संपूर्ण मानसन्मान सांभाळून निरोप देण्यात येतो. या निरोपामुळे देखील त्या संविधानिकपदाची गरिमा अधोरेखित होते. दरम्यान, मावळत्या राज्यपालांचा निरोप समारंभ आटोपत नाही तर नव्या राज्यपालांच्या आगमनाची व शपथविधीचा लगबग सुरु होते.
लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, राजभवन मुंबई)