ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 10 सप्टेंबर : गाव नमुन्यातील जमीन वहीतीखाली लावून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागणाऱ्या पाचोरा उपविभागीय कार्यालयातील सहायक महसुल अधिकाऱ्यास जळगाव लालुचपत विभागाच्या पथकाने आज 10 सप्टेंबर रोजी दुपारी रंगेहात पकडले. गणेश बाबुराव लोखंडे (वय 37 वर्ष) असे त्याचे नाव असून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची पत्नी यांच्या नावे मौजे कोकडी ता. पाचोरा शिवारात पोटखराब क्षेत्र असून त्यांनी ते मेहनत घेऊन वहीतीखाली आणले आहे. परंतु गावनमुना क्र. 7/12 मध्ये संबंधित जमीन अद्याप पोटखराब म्हणून नोंदवलेली असल्याने तक्रारदारास नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई व शेतीसंबंधी कर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे तक्रारदाराने जमीन वहीतीखाली दाखवण्यासाठी 4 सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयात अर्ज दाखल केला होता.
…अन् एसीबीकडे तक्रार दाखल –
दरम्यान, या कामासाठी आरोपी गणेश लोखंडे याने तक्रारदाराकडे 15 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यातील 5 हजार रुपये तक्रारदाराकडून पूर्वी स्वीकारले होते. उर्वरित 10 हजार रुपये घेतल्यावर काम करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, उर्वरित रक्कम देण्यास तक्रारदार तयार नसल्याने त्यांनी 9 सप्टेंबर रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीची पडताळणी दरम्यान लोखंडे यांनी मागणीची कबुली दिली. त्यानंतर आज 10 सप्टेंबर रोजी जळगाव लाचलुचपत विभागाने सापळा रचला. या कारवाईत लोखंडे यांनी तक्रारदाराकडून उर्वरित 10 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
यांनी केली कारवाई –
जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील, पो.कॉ राकेश दुसाने आणि पो.कॉ अमोल सुर्यवंशी या पथकाने कारवाई केली.