जळगाव, 13 सप्टेंबर : धरतीआबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत ‘आदि कर्मयोगी प्रतिसादात्मक शासन कार्यक्रम’ विषयक जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान नियोजन समिती सभागृह, जळगाव येथे करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते झाले. दरम्यान, या जिल्हास्तरीय कार्यशाळेचा समारोप जिल्हाधिकारी आयष प्रसाद यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
“आपला गाव समृद्धीचे स्वप्न” –
कार्यशाळेचा उद्देश आदिवासी समाजातील व्यक्ती व संस्थांना सक्षम करून “आपला गाव समृद्धीचे स्वप्न” या संकल्पनेवर आधारित नवे ग्रामविकास मॉडेल उभे करणे हा होता. या अभियानातून देशभरात 20 लाख परिवर्तनशील नेते घडविण्याचा संकल्प आहे. “सेवा, समर्पण आणि संकल्प” या तत्त्वांवर आधारलेला हा उपक्रम संपूर्ण सरकार दृष्टिकोनातून राबविण्यात येणार असून सर्व विभागांमध्ये समन्वय साधून आदिवासी भागांच्या विकासाला गती मिळणार असल्याचे सीईओ मिनल करनवाल यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
‘आदि कर्मयोगी अभियान’ –
धरतीआबा ग्राम उत्कर्ष अभियानाशी ‘आदि कर्मयोगी अभियान’ जोडले असून जळगाव जिल्ह्यातील 112 गावे यामध्ये समाविष्ट आहेत. जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर्सना (DMT) प्रशिक्षण दिल्यानंतर ते तालुका पातळीवर कार्यशाळा घेणार आहेत. प्रत्येक कार्यशाळेत किमान 20 आदि सहयोगी व आदिसाथी सहभागी होतील. या माध्यमातून ग्रामविकास आराखडा तयार करून त्यास 2 ऑक्टोबर 2025 रोजी मंजुरी देण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
आदि कर्मयोगी होणे ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया – आयुष प्रसाद
कार्यशाळेचा समारोप जिल्हाधिकारी आयष प्रसाद यांच्या उपस्थितीत झाला. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आदि कर्मयोगी होणे ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. तळागाळात नेतृत्व निर्माण करणे, गतिमान प्रशासन उभारणे आणि गावकऱ्यांच्या सहभागातून आदर्श ग्रामविकास आराखडा साकार करणे ही काळाची गरज आहे. सर्व विभागांच्या सहभागातून ग्रामविकासाची प्रक्रिया अधिक प्रभावी होईल.”
या कार्यशाळेत आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, ग्रामविकास, कृषी, पाणीपुरवठा, वनविभाग यांसह विविध विभागांतील तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे प्रस्ताविक यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी केले तर संचालन अजित जमादार (कनिष्ठ अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, जि.प. रावेर) यांनी केले. आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर्स म्हणून प्रशांत माहुरे, अजित जमादार, डॉ. प्रमोद पांढरे, अभिनव माळी, श्री. बावीस्कर, अरुण साळुखे, महेश पाटील, ज्ञानेश्वर कुमावत, रोहन महाजन, तुषार पाटील आणि धर्मराज पाटील यांनी प्रशिक्षण दिले.
हेही वाचा : राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर; जळगावात कुणाला संधी?