जळगाव, 15 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यांमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी या गावात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दोन गटात हाणामारीच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं –
जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी या गावात ही धक्कादायक घटना घडली. एकनाथ निंबा गोपाळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जुन्या वादातून ही मारहाण झाली आणि या मारहाणीत एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेतील जखमींवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, याप्रकरणी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काल दुपारी अंदाजे 1 वाजताच्या सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील बिलवाडी या गावात दोन कुटुंबात जुन्या वादातून हाणामारीची घटना घडली. त्या हाणामारीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याच अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये दहा आरोपी आहेत. यामध्ये दहापैकी 8 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
View this post on Instagram
दोन-चार वर्षांपासून त्यांचा वाद होता. त्यात काल किरकोळ विषयावरुन त्यांच्यात वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले, अशी माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. तसेच मृत व्यक्तीच्या समाजातील लोकांनी माझी भेट घेतली. तपास चांगला व्हावा आणि जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर या गुन्ह्याचा तपास चांगल्याप्रकारे होईल. तसेच उर्वरित दोन आरोपींनाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले.
नातेवाईकांची मागणी काय –
काल बिलवाडी येथे गोपाळ समाजाच्या एका कुटुंबावर रस्त्यावर अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यामध्ये एका बांधवाचा जीव गेला. तसेच बरेच माता भगिनी-बांधव मृत्यूशी झुंज देत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात आजही आमचा भटका विमुक्त समजला जाणारा गोपाळ समाज हा न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. राजरोसपणे दिवसाढवळ्या आमच्या समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे या अन्यायाला वाचा मिळावी म्हणून अखंड गोपाल समाजहित महासंघातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निवेदन देण्यात आले. जे आरोपी फरार असतील त्यांना अटक करुन कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
जळगावात रास्ता रोको आंदोलन –
दोन गटात झालेल्या वादातून काल बिलवाडी येथे एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ आज जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथे रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून न्यायाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.