ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 17 सप्टेंबर : गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पाचोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालीय. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील वेरुळी खु., वाडी-शेवाळे, शिंदाड, सातगाव डोंगरी आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. यावेळी मंत्री महाजन यांनी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी समजून त्यांनी प्रशासनास महत्वाच्या सूचना केल्या.
याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सा.बां.विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, नायब तहसीलदार विनोद कुमावत, भाजपचे दिलीप वाघ, वैशाली सुर्यवंशी, माजी जि.प. सदस्य मधूकर काटे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, युवानेते सुमित पाटील यांच्यासह महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) तसेच पक्षाचे संबंधित गावाचे सरपंच, स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.
मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना –
पाचोरा तालुक्यातील पुरग्रस्त गावांमधील बहुतांश भागात शेतात पुराचे पाणी साचलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालीय. अनेक गावांमध्ये घरांची पडझड, पशू धनाची हानी, संसारोपयोगी साहित्य, धान्य आदींचे नुकसान, ग्रामीण भागातील रस्ते – पुलांचे देखील नुकसान झाले आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध होईल तसेच नुकसानाचे पंचनामे तातडीनं पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनास आवश्यक निर्देश दिले आहेत.
…अन् प्रशासनाने केल्या तात्काळ उपाययोजना –
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी, वाडी-शेवाळे, शिंदाड, वडगाव कडे, वेरुळी खु. आदी गावांमध्ये पूरग्रस्त परिस्थितीत निर्माण झाली. दरम्यान, या पुरग्रस्त भागांत उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी के. बी. अंजने यांनी मंगळवारी सकाळपासून प्रत्यक्ष फिल्डवर भेट देऊन घराघरांत शिरलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासोबतच आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू केल्या.